Featured post

इ 9 वी चा रिझल्ट बनवण्याचे Excel सॉफ्टवेअर , Excel software for 9th result.

🌀 इ 9 वी चा रिझल्ट बनवण्याचे Excel सॉफ्टवेअर 2017-18 ! 🌀 9th Result Software 【 🚫 सूचना: क्लिक केल्यावर काही वेगळेच ओपन झाल्यास ती...

बालगीतेबालगीते
👉👉येथे क्लीक करा 👈👈

अ आ आई, म म मका
मी तुझा मामा दे मला मुका

प प पतंग आभाळात उडे
ढ ढ ढगांत चांदोमामा दडे
घ घ घड्याळ, थ थ थवा
बाळ जरि खट्याळ, तरि मला हवा

ह ह हम्मा गोड दूध देते
च च चिऊ अंगणात येते
भ भ भटजी, स स ससा
मांडिवर बसा नि खुदकन हसा

क क कमळ पाण्यावर डुले
ब ब बदक तुरुतुरु चाले
ग ग गाडी झुक झुक जाई
बाळ माझे कसे गोड गाणे गाई********************************************************************************

अग्गोबाई ढग्गोबाई लागली कळ
ढगाला उन्हाची केवढी झळ
थोडी न्‌ थोडकी लागली फार
डोंगराच्या डोळ्याला पाण्याची धार

वारा वारा गरागरा सो सो सूम्‌
ढोल्या ढोल्या ढगात ढुम ढुम ढुम
वीजबाई अशी काही तोर्‍यामधे खडी
आकाशाच्या पाठीवर चमचम छडी

खोलखोल जमिनीचे उघडून दार
बुडबुड बेडकाची बडबड फार
डुंबायला डबक्याचा करूया तलाव
साबु-बिबु नको थोडा चिखल लगाव

************************************************************************************************ असावा सुंदर चॉकलेटचा बंगला
चंदेरी सोनेरी चमचमता चांगला

चॉकलेटच्या बंगल्याला टॉफीचं दार
शेपटीच्या झुपक्यानं झाडून जाईल खार


गोल गोल लेमनच्या खिडक्या दोन
"हॅलो, हॅलो!" करायला छोटासा फोन!

बिस्कटांच्या गच्‍चीवर मोर छानदार
पेपरमिंटच्या अंगणात फुलं लाललाल

चांदीच्या झाडामागं चांदोबा रहातो
मोत्यांच्या फुलांतून लपाछपी खेळतो

उंच उंच झोक्याचा खेळ रंगला
मैनेचा पिंजरा वर टांगला

किती किती सुंदर चॉकलेटचा बंगला
चंदेरी सोनेरी चमचमता चांगला

************************************************************************************************
सांग मला रे सांग मला
आई आणखी बाबा यातुन, कोण आवडे अधिक तुला?

आई दिसते गोजिरवाणी, आई गाते सुंदर गाणी
तर्‍हेतर्‍हेचे खाऊ येती, बनवायाला सहज तिला!
आई आवडे अधिक मला!

गोजिरवाणी दिसते आई, परंतु भित्री भागुबाई
शक्‍तिवान किती असती बाबा थप्पड देती गुरख्याला!
आवडती रे वडिल मला!

घरात करते खाऊ आई, घरातल्याला गंमत नाही
चिंगम अन्‌ चॉकलेट तर, बाबा घेती रस्त्याला!
आवडती रे वडिल मला!

कुशीत घेता रात्री आई, थंडी-वारा लागत नाही
मऊ सायीचे हात आईचे सुगंध तिचिया पाप्याला!
आई आवडे अधिक मला!

निजता संगे बाबांजवळी भुते-राक्षसे पळती सगळी
मिशा चिमुकल्या करती गुदगुल्या त्यांच्या अपुल्या गालाला!
आवडती रे वडिल मला!

आई सुंदर कपडे शिवते, पावडर, तिटी तीच लावते
तीच सजविते सदा मुलींना रिबीन बांधुन वेणीला!
आई आवडे अधिक मला!

त्या रिबिनीला पैसे पडती ते तर बाबा मिळवुनि आणती
कुणी न देती पैसा-दिडकी घरात बसल्या आईला!
आवडती रे वडिल मला!

बाई म्हणती माय पुजावी, माणूस ती ना असते देवी
रोज सकाळी नमन करावे हात लावुनी पायाला!
आई आवडे अधिक मला!

बाबांचा क्रम वरती राही, त्यांच्या पाया पडते आई!
बाबा येता भिऊन जाई सावरते ती पदराला!
आवडती रे वडिल मला!

धडा शीक रे तू बैलोबा, आईहुनही मोठ्ठे बाबा
म्हणून आया तयार होती, बाबांसंगे लग्‍नाला!
आवडती रे वडिल मला!

************************************************************************

आई, बघ ना कसा हा दादा?
मला चिडवायचं हाच याचा धंदा!

बाहुलीचं लग्‍न लावता आम्ही
म्हणतो, "नवरदेव आहे मी
आता मलाच मुंडावळी बांधा!"

कधी मोठेमोठे करतो डोळे
कधी उगाच विदुषकी चाळे
भारी खट्याळ, नाहि मुळि साधा

दादा भलताच द्वाड आहे आई
खोड्या करून छळतो बाई
याला ओवाळायची नाही मी यंदा

*********************************************************************************************
आई व्हावी मुलगी माझी, मी आईची व्हावे आई
नको बोलणी खारट, आंबट, विटले विटले बाई

सूर्यापूर्वी उठा सकाळी, चहा ऐवजी दूध कपाळी
आंघोळीच्या वेळी चोळा डोईस शिक्‍केकाई

'केस कोरडे कर ग पोरी', सात हात त्या जटा विंचरी
'नको पावडर दवडू बाई', कोकलते ही आई

शाळेनंतर पुन्हा शिकवणी, रोजचीच ती फुका जाचणी
लहान भावादेखत अगदी कान पकडते बाई

*****************************************************************************************

आईसारखे दैवत सार्‍या जगतावर नाही
म्हणून श्रीकाराच्या नंतर शिकणे अ, आ, ई
मुलांनो शिकणे अ, आ, ई

तीच वाढवी ती सांभाळी
ती करी सेवा तीन त्रिकाळी
देवानंतर नमवी मस्तक आईच्या पायी

कौसल्येविण राम न झाला
देवकीपोटी कृष्ण जन्मला
शिवरायाचे चरित्र घडवी माय जिजाबाई

नकोस विसरू ऋण आईचे
स्वरूप माउली पुण्याईचे
थोर पुरुष तू ठरून तियेचा होई उतराई

*********************************************************************************************
"आणायचा, माझ्या ताईला नवरा आणायचा!"
"नको बाई नको, मला नवरा नको."

"त्याचं खप्पडच नाक, त्याच्या पाठीला बाक
दोन्ही डोळ्यांनी चकणा शोधायचा!
माझ्या ताईला नवरा आणायचा!"

"माझ्या दादाला बायको आणायची!"
"नको बाबा नको, मला बायको नको."

"लाटणं तिच्या हाती, लागे तुझ्या पाठी
भोपळा टुणुक टुणुक तशी चालायची.
माझ्या दादाला बायको आणायची!"

"माझ्या ताईला नवरा आणायचा!
घट राहील अशा, मोठ्या दाढी-मिशा
बायको उडून जाईल असा घोरायचा.
माझ्या ताईला नवरा आणायचा!"

"माझ्या दादाला बायको आणायची!
तिचा घसा कसा? गाढव गाई तसा.
लाडे लाडे तुझ्याशी बोलायची.
माझ्या दादाला बायको आणायची!"

**********************************************************************************************

रुसु बाई रुसु कोपर्‍यात बसु
आमच्यासंगे बोला आता, ढिश्यू, ढिश्यू, ढिश्यू
हाहा ..... ही ही ....... हो हो
आता तुमची गट्टी फू
आल बाल बारा वर्षं बोलू नका कोणी
चॉकलेट नका दाखवू हं, तोंडाला सुटेल पाणी

आमचा राजू का रुसला, आमचा राजू का रुसला?
सांगशील का माझ्या कानी राग तुझा कसला?

गाल गोबरे गोरे गोरे, लबाड डोळे दोन टपोरे
आनंदी हा चंद्र मुखाचा उदास का दिसला?
राग तुझा कसला, आमचा राजू का रुसला?

बावन पत्ते बांधु वाडा, शर्यत खेळू घोडा घोडा
घरदाराला खेळवणारा झाला हिरमुसला
राग तुझा कसला, आमचा राजू का रुसला?

चिमणी खाई मोती-दाणे, गोड कोकिळा गाई गाणे
अल्लड भोळा गवई माझा अबोल का बसला?
राग तुझा कसला, आमचा राजू का रुसला?

*********************************************************************************************

वल्हव रे नाखवा, वल्हव रे नाखवा, वल्हव रे नाखवा, वल्हव

आम्ही कोळ्याची पोरं हाय्‌ हो, हाय्‌ हो, हाय्‌ हो
आम्हां दर्याची भीती नाय हो, नाय हो, नाय हो

वर आभाळ भरलंय्‌ हो
जाळं जोरात धरलंय्‌ हो
कोण करील अम्हां काय हो, काय हो, काय हो?

लाटं जोसात येऊ द्या
झेप खुशाल घेऊ द्या
मागे घेणार न्हाई पाय हो, पाय हो, पाय हो

देव मल्हारी पावला हो
मासा जाळ्यात गावला हो
होडी मजेत पुढं जाय हो, जाय हो, जाय हो

*************************************************************************************************

आला आला पाउस आला
बघा बघा हो आला आला
पाउस आला ..... पाउस आला

काळ्याकाळ्या मेघांमधुनी
शुभ्र कशा या धारा झरती
अवतीभवती झुलू लागल्या जलधारांच्या माळा

हसली झाडे, हसली पाने
फुले-पाखरे गाती गाणे
ओल्याओल्या मातीचाही श्वास सुगंधी झाला

धरणी दिसते प्रसन्‍न सारी
पागोळ्यांची नक्षी न्यारी
फांदीफांदीवरी थाटली थेंबांची ही शाळा

*************************************************************************************************

आला रे आला, आला आला फेरीवाला
भवती बालगोपालांचा मेळा जमला

फेरीवाल्या, फेरीवाल्या, गाडीत काय? तुझ्या गाडीत काय?
तुझ्या गाडीत खेळणी काय काय?
सांगू?
हो, हो, सांग.. सांग..

लाकडाचा काऊ आहे, रबराची माऊ आहे
मातीचा आऊ आहे, प्लॅस्टिकची चिऊ आहे
राणी आहे, राजा आहे, फूं फूं वाजे बाजा आहे
चेंडू आहे, शिट्टी आहे, दांडू आहे, विट्टी आहे
देऊ तुम्हाला काय यातले लौकर आता बोला?
नको, नको रे फेरीवाल्या, अशी खेळणी आम्हांला
आला रे आला, आला आला फेरीवाला

फेरीवाल्या, फेरीवाल्या, आणखीन काय? तुझ्या गाडीत काय?
तुझ्या गाडीत आणखी काय काय?
सांगू?
हो, हो, सांग.. सांग..

मगर आहे, सुसर आहे, हरीण, वाघ, डुक्कर आहे
प्राणी आहे, पक्षी आहे, फुलवेलींची नक्षी आहे
गाडी आहे, घोडा आहे, नवरा-नवरी जोडा आहे
रेल्वे, मोटार, ट्रॅम आहे, इलेक्ट्रीकचा खांब आहे
शहाजहानचा ताज आहे, संसाराचा साज आहे
देऊ तुम्हाला काय यातले लौकर आता बोला?
नको, नको रे फेरीवाल्या, अशी खेळणी आम्हांला
आला रे आला, आला आला फेरीवाला

फेरीवाल्या, फेरीवाल्या, आणखीन काय? तुझ्या गाडीत काय?
तुझ्या गाडीत आणखी काय काय?
सांगू?
हो, हो, सांग.. सांग..

हाती धरुनिया तलवार, झाला घोड्यावरती स्वार
ज्याचे देशप्रेम अनिवार, ज्याचा राष्ट्राला आधार
नच गेला कोणा हार, जो स्वप्नं करी साकार
त्या शिवबाच्या मूर्ती माझियापाशी.. सांगा, काय तुम्ही घेणार?
आम्ही मूर्ती तुझ्या घेणार, आम्ही मूर्ती तुझ्या घेणार
शिवरायाला रोज स्मरोनी आम्ही देखिल देशभक्‍त होणार
तुमची आवड पाहुन बालांनो मज हर्ष मनी झाला
एक, एक दे शिवरायाची मूर्ती आम्हां सर्वांला
आला रे आला, आला आला फेरीवाला

**********************************************************************************************

आली बघ गाई गाई शेजारच्या अंगणात
फुललासे निशिगंध, घोटाळली ताटव्यात

आली बघ गाई गाई, चांदण्यांचे पायी चाळ
लाविले का अवधान ऐकावया त्यांचा ताल?

आली बघ गाई गाई, लावी करांगुली गाली
म्हणुन का हसलीस उमटली गोड खळी

आली बघ गाई गाई, लोचनांचे घेई पापे
म्हणून का भारावले डोळे माझ्या लाडकीचे?

आली बघ गाई गाई कढितसे लांब झोका
दमलीस खेळूनिया झाक मोतियांच्या शिंपा

*********************************************************************************************

आवडती भारी मला माझे आजोबा

पाय त्यांचे थकलेले
गुडघ्यात वाकलेले
केस सारे पिकलेले
ओटीवर गीता गाती माझे आजोबा

नातवंडा बोलावून
घोगर्‍याशा आवाजानं
सांगती ग रामायण
मोबदला पापा घेती माझे आजोबा

रागेजता बाबा-आई
अजोबांना माया येई
जवळी ते घेती बाई
कुटलेला विडा देती माझे आजोबा

खोडी करी खोडकर
अजोबांची शिक्षा थोर
उन्हामध्ये त्यांचे घर
पोरांसंगे पोर होती माझे आजोबा

********************************************************************************************

आवडतो मज आवडतो, मनापासुनी आवडतो

सहवास लागता गोड
का मना लागते ओढ
मज दर्शन होता त्याचे
मन वेडे होऊन नाचे
मळ्यात राही कधितरी अन्‌ तो तळ्यात केव्हा सापडतो

कधी थकुनी त्याने यावे
मी हळूच कुरवाळावे
कधी येता त्याला रंग
अंगास घासतो अंग
दोस्त जिवाचा, चिंगलिंग चाचा, बैल लाडका आवडतो

*********************************************************************************************
लहान सुद्धा महान असते ठाऊक आहे तुम्हाला
इवले इवले जीवही येती मोठ्या मोठ्या कामाला!

महा भयंकर सिंह एकदा गुहेमध्ये निजलेला
एक छोटासा उंदीर आला,
सिंहाच्या अंगावर चढुनी ओढी दाढी-मिशाला!
सिंह जागला करीत गर्जना धरिला उंदीर त्याने,
म्हणे चिमुरड्या, "तुला फाडतो माझ्या या पंजाने."
थरथर कापे, उंदीर सांगे, "येईन कधितरी कामाला!"
इवले इवले जीवही येती मोठ्या मोठ्या कामाला!

( या थरथर कापणार्‍या उंदराचा सिंहाने उपहास केला.
तो म्हणाला, "अरे मूर्खा तू माझ्या एका घासाचाही नाहीस!
चिमुरडा तू, वनराजाच्या कसल्या कामी येणार आहेस रे?
चल, चालता हो इथून."
सुटका होताच उंदीर बिळात पळून गेला. पण एकदा काय झालं ठाऊक आहे?)

कधी एकदा सिंह अडकला फसूनिया जाळ्यात
वनराजा हो केविलवाणा ये पाणी डोळ्यांत!
हादरे जंगल, अशी गर्जना ऐकून उंदीर धावे
सिंहाला तो सांगे, "आता माझे शौर्य बघावे!
भिऊ नका हो, रडू नका हो, सोडवितो तुम्हाला.
नका लोचनी आणू पाणी, पाळीन मी वचनाला."
सर्व शक्‍तीने कुरतडुनीया उंदीर तोडी जाळे
पाहून सारे मग सिंहाचे भरुनी आले डोळे!
जीव चिमुकला संकटकाळी अखेर कामी आला
इवले इवले जीव कितिदा येती मोठ्या कामाला!

**********************************************************************************************

इवल्या इवल्या वाळूचं, हे तर घरकुल बाळूचं
बाळू होता बोटभर, झोप घेई पोटभर
वरती वाळू, खाली वाळू, बाळू म्हणे की, "इथेच लोळू"
उन्हात तापू लागे वाळू, बाळूला ती लागे पोळू
या इवल्याशा खोपेत, बाळू रडला झोपेत!

एक वन होतं वेळूचं, त्यात घर होतं साळूचं
साळू मोठी मायाळू, वेळू लागे आंदोळू
त्या पंख्याच्या वार्‍यात, बाळू निजला तोर्‍यात!
एकदा पाऊस लागे वोळू, भिजली वाळू, भिजले वेळू
नदीला येऊ लागे पूर, बाळू आपला डाराडूर

भुर्रकन्‌ खाली आली साळू आणि म्हणाली, "उठ रे बाळू"
बाळू निजला जैसा धोंडा, तोवर आला मोठा लोंढा
साळुनं मग केलं काय? चोचीत धरला त्याचा पाय
वेळूवरती नेले उंच आणि मांडला नवा प्रपंच
बाळूचं घरकुल वाहून गेलं, साळूचं घरटं राहून गेलं!

साळू आहे मायाळू, बाळू बेटा झोपाळू
वाळू आणि वेळूवर ताणून देतो खालीवर
साळू म्हणते, "गाऊ, खेळू", बाळू म्हणतो, "इथंच लोळू."
आमची गोष्ट आखुड, संध्याच्या पाठीत लाकूड

*************************************************************************************************

इवल्याइवल्याशा
टिकल्याटिकल्यांचे
देवाचे घर बाई, उंचावरी
ऐक मजा तर ऐक खरी!

निळीनिळी वाट
निळेनिळे घाट
निळ्यानिळ्या पाण्याचे झुळझुळ पाट
निळ्यानिळ्या डोंगरात निळीनिळी दरी!

चांदीच्या झाडांना सोन्याची पाने
सोनेरी मैनेचे सोनेरी गाणे
सोन्याची केळी, सोन्याचा पेरू
सोनेरी आंब्याला सोन्याची कैरी!

देवाच्या घरात गुलाबाची लादी
मऊमऊ ढगांची अंथरली गादी
चांदण्यांची हंडी, चांदण्यांची भांडी
चांदोबाचा दिवा मोठा लावला वरी!

**************************************************************************************************
उगी उगी गे उगी
आभाळातून खाली येते चांदोबाची पहा बगी

ढगावरून ती चाले गाडी
शुभ्र पांढरी जरा वाकडी
ससा सावळा धावत ओढी
असली अद्भुत गाडी कुठली रडणार्‍यांच्या कुढ्या जगी

चांदोबाच्या बघ माथ्यावर
निळसर काळी छत्री सुंदर
नक्षत्रांची तिजसी झालर
हसणार्‍यांच्या घरी पिकवितो सर्व सुखाची चंद्रसुगी

उगी, पहा तो खिडकियात
चांदोबाचा आला हात
स्‍नात आईचा जणु दुधात
घे पापा तू त्या हाताचा भरेल इवले पोट लगी

**************************************************************************************************
उठा उठा चिऊताई
सारीकडे उजाडले
डोळे तरी मिटलेले
अजूनही अजूनही!

सोनेरी हे दूत आले
घरट्याच्या दारापाशी
डोळ्यांवर झोप कशी
अजूनही अजूनही!

लगबग पाखरे ही
गात गात गोड गाणे
टिपतात बघा दाणे
चोहीकडे चोहीकडे!

झोपलेल्या अशा तुम्ही
आणायाचे मग कोणी
बाळासाठी चारापाणी
चिमुकल्या चिमुकल्या!

बाळाचे मी घेता नाव
जागी झाली चिऊताई
उठोनिया दूर जाई
भूर भूर भूर भूर!

************************************************************************************************

ए आई मला पावसात जाउ दे
एकदाच ग भिजुनी मला चिंब चिंब होऊ दे

मेघ कसे बघ गडगड करिती
वीजा नभातुन मला खुणविती
त्यांच्यासंगे अंगणात मज खूप खूप नाचु दे

बदकांचा बघ थवा नाचतो
बेडुक दादा हाक मारतो
पाण्यामधुनी त्यांचा मजला पाठलाग करु दे

धारेखाली उभा राहुनी
पायाने मी उडविन पाणी
ताप, खोकला, शिंका, सर्दी, वाट्टेल ते होऊ दे

********************************************************************************

एक कोल्हा, बहु भुकेला, फार होता कावला
एक तुकडा परि न त्याला, खावयासी गावला

बापड्याने जंगलाचा भाग सारा धुंडला
भर दुपारी तो बिचारा दीनवाणा हिंडला
शेवटाला थकून गेला सावलीला थांबला

उंच होते झाड त्याला उंच शेंडा कोवळा
बसून वरती खाऊ खाई एक काळा कावळा
चोचीमध्ये मास धरुन चाखितो तो मासला

मारुनिया हाक त्यासी गोड कोल्हा बोलला,
"एक गाणे गा मजेने साज तुमचा चांगला
कोकिळेचे आप्‍त तुम्ही, घरीच त्यांच्या वाढला"

मूर्ख वेड्या कावळ्याने रागदारी मांडली
चोचीमधली चीज त्याच्या त्वरित खाली सांडली
धावला कोल्हा सुखाने घास त्याने सेविला

***********************************************************************************************

एक होता काऊ, तो चिमणीला म्हणाला
"मला घाल न्हाऊ, घाल न्हाऊ, घाल न्हाऊ"

एक होता पोपट, तो चिमणीला म्हणाला
"तू मला थोपट, तू मला थोपट, तू मला थोपट"

एक होती घूस, ती चिमणीला म्हणाली
"तू माझे अंग पूस, तू माझे अंग पूस, तू माझे अंग पूस"

एक होती गाय, तिने चिमणीला विचारले
"तुझे नाव काय, तुझे नाव काय, तुझे नाव काय?"

एक होते कासव, ते चिमणीला म्हणाले
"मला चड्डी नेसव, मला चड्डी नेसव, मला चड्डी नेसव"

*************************************************************************************************

कर आता गाई गाई
तुला गाते मी अंगाई
आज माझ्या बाहुलीची
झोप कुणी नेली बाई?

बोळक्यांची उतरंडी
लुटुपुटीची चूल
आवरले आहे बाई
आता कुठे घरकुल!

काम सारे उरकता
थकला ग माझा जीव
नको छळू तूही राणी
येऊ दे ना जरा कीव?

नीज नीज लडिवाळे
नको रडू, देते झोका
उभा बागुल दाराशी
सांग त्यास बोलावू का?

*********************************************************************************

कशासाठी पोटासाठी
खंडाळ्याच्या घाटासाठी

चला खेळू आगगाडी,
झोका उंच कोण काढी?
बाळू, नीट कडी धर
झोका चाले खाली वर
ऐका कुकुक्‌ शिट्टी झाली
बोगद्यात गाडी आली
खडखड भकभक
अंधारात लखलख
इंजिनाची पहा खोडी
बोगद्यात धूर सोडी
नका भिऊ थोड्यासाठी
लागे कुत्रे भित्यापाठी

उजेड तो दूर कसा
इवलासा कवडसा
नागफणी डावीकडे
कोकण ते तळी पडे
पाठमोरी आता गाडी
वाट मुंबईची काढी
खोल दरी उल्लासाची
दो डोक्यांचा राजमाची
पडे खळाळत पाणी
फेसाळल्या दुधावाणी
आता जरा वाटे दाटी
थंड वारा वरघाटी

डावलून माथेरान
धावे गाडी सुटे भान
तारखांब हे वेगात
मागे मागे धावतात
तार खाली वर डोले
तिच्यावर दोन होले
झाडी फिरे मंडलात
रूळ संगे धावतात
आली मुंबई या जाऊ
राणीचा तो बाग पाहू
गर्दी झगमग हाटी-
कशासाठी? पोटासाठी!

*****************************************************************************************

काडकीच्या टोकावर ताणलाय दोर
दावतोय करामत इवलासा पोर
न्हाई नजर ठरणार वरी, खेळ डोंबारी करी
कशी कसरत दावतुया न्यारी, खेळ डोंबारी करी

दुमडुन एक केली पोट आणि पाठ
जल्माची घातलीया मरणाशी गाठ
जीव लाखाचा फेकलाय वरी
कशी कसरत दावतुया न्यारी, खेळ डोंबारी करी

शेलाट्या अंगाची घातलीया घडी
लवलव लवतिया वेताची छडी
फूल डोंगरचं फुललंय्‌ दारी
कशी कसरत दावतुया न्यारी, खेळ डोंबारी करी

घडीत आभाळ घडीत धरती
कोरभर भाकर पोटाला पुरती
पान मघावती रानातली दरी
कशी कसरत दावतुया न्यारी, खेळ डोंबारी करी

******************************************************************************************************

किलबिल किलबिल पक्षि बोलती, झुळझुळ झुळझुळ झरे वाहती,
पानोपानी फुलें बहरती, फूलपाखरे वर भिरभिरती,
स्वप्‍नी आले काही, एक मी गाव पाहिला बाई!

त्या गावाची गंमत न्यारी, तिथे नांदती मुलेच सारी
कुणी न मोठे, कुणी धाकटे, कुणी न बसते तिथे एकटे
सारे हसती, गाति नाचती, कोणी रडके नाही

नाही पुस्तक, नाही शाळा, हवे तेवढे खुशाल खेळा
उडो बागडो, पडो, धडपडो, लागत कोणा नाही

तिथल्या वेली गाणी गाती, पर्‍या हासर्‍या येती जाती
झाडांवरती चेंडु लटकती, शेतांमधुनी बॅटी
म्हणाल ते ते सारे होते, उणे न कोठे काही

******************************************************************************************************

कोण येणार ग पाहुणे
ताई मला सांग, मला सांग, मला सांग
कोण येणार ग पाहुणे

आज सकाळपासून ग,
गेली ताईची घाई उडून
आरशासमोरी बसून आहे बुवा ऐट
घाल बाई नवे दगिने

झाली झोकात वेणी-फणी
नविन कोरी साडी नेसुनी
ताई माझी जरी दिसे देखणी
गोरे गोरेपान तेही आहेत सुंदर म्हणे

नको सांगूस जा ग मला
मीच मज्जा सांगते तुला
गोड गोड खाऊ मला देतील नवे मेहुणे

*****************************************************************************************************
कोणास ठाऊक कसा? पण सिनेमात गेला ससा!
सशाने हलविले कान, घेतली सुंदर तान,
सा नि ध प म ग रे सा रे ग म प
दिग्दर्शक म्हणाला, "वाहवा!", ससा म्हणाला, "चहा हवा!"

कोणास ठाऊक कसा पण सर्कशीत गेला ससा!
सशाने मारली उडी, भरभर चढला शिडी
विदुषक म्हणाला, "छान छान!", ससा म्हणाला, "काढ पान!"

कोणास ठाऊक कसा पण शाळेत गेला ससा!
सशाने म्हंटले पाढे
बे एकं बे, बे दुणे चार, बे त्रीक सहा, बे चोक आठ आणि घडघड वाचले धडे
गुरुजी म्हणाले, "शाब्बास!", ससा म्हणाला, "करा पास!"
*************************************************************************************
सावळ्या:
खबरदार जर टाच मारुनी जाल पुढे चिंधड्या
उडविन राई राई एवढ्या!
कुण्या गावचे पाटील आपण कुठे चालला असे
शीव ही ओलांडून तीरसे?
लगाम खेचा हा घोडीचा राव टांग टाकुनी
असे या तुम्ही खड्या अंगणी!
पोर म्हणूनी हसण्यावारी वेळ नका नेऊ ही
मला का ओळखले हो तुम्ही?
हा मर्द मराठ्याचा मी बच्‍चा असे
हे हाड ही माझे लेचेपेचे नसे
या नसानसांतून हिंमत बाजी वसे
खबरदार जर टाच मारुनी जाल पुढे चिंधड्या
उडविन राई राई एवढ्या!

स्वार:
मळ्यात जाऊन मोटेचे ते पाणी भरावे तुवा
कशाला ताठा तुज हा हवा?
मुठीत ज्याच्या मूठ असे ही खड्गाची तो बरे
वीर तू समजलास काय रे?
थोर मारिसी अशा बढाया पराक्रमाच्या जरी
कुठे तव भाला बरची तरी?
हे खड्गाचे बघ पाते किती चमकते
अणकुचीदार अति भाल्याचे टोक ते

3 comments:

  1. Khup chan. Mazy mulila shikavaanysthi khup upayogi aaahe.Dhanayvad

    ReplyDelete
  2. Khup chan. Mazy mulila shikavaanysthi khup upayogi aaahe.Dhanayvad

    ReplyDelete
  3. खूप उपयोगी

    ReplyDelete

Powered by Blogger.