Featured post

इ 9 वी चा रिझल्ट बनवण्याचे Excel सॉफ्टवेअर , Excel software for 9th result.

🌀 इ 9 वी चा रिझल्ट बनवण्याचे Excel सॉफ्टवेअर 2017-18 ! 🌀 9th Result Software 【 🚫 सूचना: क्लिक केल्यावर काही वेगळेच ओपन झाल्यास ती...

करून पहा - साधे सोपे प्रयोग.

करून पहा - साधे सोपे प्रयोग.

155.                   कुत्र्याच्या केसातून वीज
साहित्य – एक मोठा फुगा, कुत्रा, नळ, पाणी.
कृती – एक मोठा फुगा घ्या. तो फुगवा. फुग्याच्या तोंडाला गाठ मारा. एका कुत्र्याच्या पाठीच्या केसांवरून फुगा सात आठ वेळा फिरवा. एका नळातून पाण्याची बारीक धार सोडा. तो फुगा हळुहळू पाण्याच्या धारेच्या जवळ आणा. पाण्याची धार फुग्याकडे ओढली गेलेली दिसेल.
कुत्र्याच्या पाठीवरील केसांवर घासल्यामुळे फुग्याच्या पृष्ठभागावर घर्षणजन्य वीज तयार होते ती पाण्याच्या धारेला ओढते.

154.                   तेलाच्या गोळ्यांची हालचाल
साहित्य – काचेचा उंच पेला, पाणी, तेल, साखर, चमचा.
कृती – एक काचेचा उंच पेला घ्या. तो अर्धा भरेल इतके पाणी त्यात टाका. त्याच्यावर दोन सेंटीमीटर जाडीचा थर होईल इतके तेल ओता. तेलाच्या थरावर चमच्याने थोडी थोडी साखर टाका. काही साखर जड होऊन तळाशी जायला लागली की साखर टाकणे थांबवा. साखरे बरोबर तेलाचा गोळा खाली पाण्यात जाईल. तळाशी गेला की पुन्हा वर येईल. तेव्हा तेलाचा दुसरा गोळा खाली जाईल. तेलाच्या गोळ्याच्या या हालचाली कितीतरी वेळ चालू राहातील.
साखरेच्या वजनाने तेल पाण्यात ढकलले जाते. पाण्यात गेल्यावर त्याचा गोळा होतो. पाण्याच्या उद्धरण शक्तीमुळे तो पुन्हा वर ढकलला जातो. त्याबरोबर थोडी साखरही तेलाच्यावर ढकलली जाते आणि पुन्हा पुन्हा ते घडत राहाते.

153.                   पाणी वाचवण्याची युक्ती.
साहित्य –  छोट्या तोंडाची कळशी, पाणी, प्लॅस्टिकचा कागद, रबर बँड, खिळा.
कृती – एक छोट्या तोंडाची कळशी घ्या. ती पाण्याने पाऊण पातळीपर्यंत भरा. कळशीच्या तोंडावर एक प्लॅस्टिकचा कागद ताणून बसवा. रबर बँड लावून तो पक्का बसवा. एक खिळा घेऊन या कागदावर भोके पाडा. कळशी पटकन उपडी करा. उपडी केली तरी कळशीतून पाणी पडणार नाही. कळशी थोडी तिरपी करा. पाणी पडायला लागेल. पुन्हा उभी करा पाणी यायचे थांबेल. ही युक्ती आत्मसात करून पाणी वाचवा.
कळशी उपडी केल्यावर बाहेरील हवेच्या दाबामुळे पाणी पडत नाही. तिरपे किल्यावर आत हवा शिरते आणि तेवढे पाणी बाहेर पडते.

152.                   उठावाचे चित्र.
साहित्य – कागद, पट्टी, पेन्सिल.
कृती – एक कोरा कागद घ्या. त्याच्या दोन बाजूंवर एक एक सेंटीमीटरच्या खुणा करा. कागदावर तुमचा एक तळहात ठेवा. दुसर्‍या हातात पेन्सिल घेऊन तळहाताची बाह्यरेषा पुसट काढा. आता एक पट्टी आणि पेन्सिल घेऊन कागदावर समोरासमोरच्या एक एक सेंटीमीटरच्या खुणा जोडणार्‍या रेषा काढा. रेष हाताच्या चित्रामधून जात असेल तर त्या भागात रेघ काढू नका. अशा सर्व रेषा काढून झाल्यावर हाताच्या चित्राच्या आतले एकाच रेषेवरचे समोरासमोरचे बिंदू वर्तुळाच्या कंसासारखे जरा वरच्या बाजूने जोडा. हात कागदावरून उचलल्यासारखा दिसेल.
समांतर पातळीतल्या रेषा एका प्रतलात दिसल्यामुळे वक्र रेषा दुसर्‍या प्रतलात असल्याचे मेंदूला वाटते.  

151.                   रेषांनी गुणाकार.
साहित्य – कागद, पेन्सिल.
कृती – एक कागद घ्या. दोन आकडी संख्या घ्या. उदा. १३ आणि २१. एका कागदावर ५ सेंटीमीटर लांबीच्या तिरप्या रेषा काढत ही संख्या दाखवायची आहे. १३ तील १ दाखवण्यासाठी खालून वर जाणारी एक तिरपी रेष काढा. थोडे अंतर ठेवून याच रेषेला समांतर अशा ३ रेषा काढा. म्हणजे १३ झाले. २१ काढण्यासाठी वरून खाली जाणार्‍या पण १३च्या रेषांना छेदणार्‍या रेषा काढायच्या आधी समांतर अशा २ रेषा काढा मग थोड्या अंतरावर १ रेष काढा. 

या रेषांच्या छेदण्यामुळे आडवा चौकट असल्यासारखी आकृती तयार होईल. त्या आकृतीत सर्वात उजवीकडे, मध्ये आणि डावीकडे किती छेदनबिंदू येतात ते मोजून लिहा. गुणाकाराचे उत्तर मिळेल.

150.                   रंगीत कोबीच्या पानाचा रस.
साहित्य – रंगीत कोबी, पातेले, बत्ता, पाणी, गाळणे, पारदर्शक बाटली, आम्ल, खाण्याचा सोडा.
कृती – एका रंगीत कोबीची चार पाने काढून घ्या. या पानांचे बारीक बारीक तुकडे करून पातेल्यात टाका. एक बत्ता घेऊन हे तुकडे पातेल्यातच चांगले चेचा. त्यात थोडे पाणी घाला. पुन्हा बत्त्याने चेचा. थोडा वेळ ते निवळू द्या. नंतर हा लाल रस गाळण्याचा वापर करून एका छोट्या पारदर्शक बाटलीत घ्या. बाटलीत थोडे आम्ल टाकून हलवा. रसाचा रंग बदललेला दिसेल. आता त्यात थोडा खाण्याचा सोडा टाकून हलवा. पुन्हा रंग बदललेला दिसेल. पुन्हा पुन्हा आम्ल आणि सोडा आळीपाळीने टाकत बदलणार्‍या रंगाचे निरीक्षण करा.

149.                 गरागरा फिरणारा साप.
साहित्य – जाड कागद, शिसपेन्सिल, कंपास, कात्री, दोरा, मेणबत्ती, काड्यापेटी.

कृती – एक जाड कागद घ्या. कंपास आणि शिसपेन्सिलीचा वापर करून त्या कागदावर एक १० सेंटीमीटर त्रिज्येचे एक वर्तुळ आखा. ते कात्रीने कापून घ्या. या वर्तुळाच्या मध्यभागी २ सेंटीमीटर त्रिज्येचे वर्तुळ आखा. हे सापाचे डोके आहे अशी कल्पना करा. केंद्रस्थानी सुमारे ५० सेंटीमीटर लांबीचा दोरा ओवून बांधा. शिसपेन्सिलीचा वापर करत आतल्या वर्तुळापासून बाहेरच्या वर्तुळापर्यंत तीन वेटोळ्याची एक रेघ काढा. या रेघेवरून कात्रीने मधल्या वर्तुळापर्यंत कापा. दोरी पकडून उंच धरा. साप उचलल्यासारखे दिसेल. एक मेणबत्ती पेटवून जमिनीवर ठेवा. उचललेली सापाची आकृती मेणबत्तीच्या वर एक वीत उंच धरा. ती गरागरा फिरेल.
सर्पिल आकारातून मेणबत्तीच्या ज्योतीची गरम हवा वर जाताना त्याला वर्तुळाकार गती मिळते.
 
148.                   उष्णता धारकता.
साहित्य – थर्मोकोलचे कप, वाळू, माती, पाणी, तापमापी.
कृती – थर्मोकोलचे पाच कप घ्या. एका कपात पाणी भरा. दुसर्‍या कपात वाळू भरा. तिसर्‍या कपात माती भरा. चौथ्या कपात आधी पाणी भरून नंतर त्यात वाळू भरा. पाचव्या कपात आधी पाणी भरून नंतर त्यात माती भरा.
या पाचही कपांमधील पदार्थांचे तापमान नोंदवा. आता सर्व कप दक्षिण-उत्तर दिशेत ओळ करून एक तास उन्हात ठेवा. त्यानंतर पाचही कपांमधील पदार्थांचे तापमान नोंदवा. कपांच्या तापमानात पडलेल्या फरकाची नोंद घ्या. फरक कमी म्हणजे आतल्या उष्माधारकता जास्त.
पाण्याची उष्माधारकता सर्वात जास्त दिसेल.147.                   हवेत दमटपणा किती?
साहित्य – दोन तापमापी, एक स्टँड, चिंधी, दोरा, छोटी बाटली, पाणी.
कृती – दोन तापमापी घेऊन त्या एका स्टँडला बांधा. एका तापमापीच्या पारा असलेल्या टोकाला एक चिंधी बांधा. त्या तापमापीखाली एक छोटी बाटली ठेवा. बाटलीत पाणी भरा. या तापमापीचे तापमान कोरड्या तापमापीतल्या तापमानापेक्षा कमी झालेले दिसेल. या दोन तापमानांतला फरक जेवढा जास्त तेवढा हवेत दमटपणा कमी.

पाण्याची वाफ होण्यासाठी उर्जा लागते ती ओल्या तापमापीतून काढून घेतली जाते. हवेत बाष्प कमी असेल तर ओल्या तापमापीखालचे पाणी जास्त प्रमाणात बाष्पीभूत होते. 
 
  
146.                   सावलीत बदलणारा रंग.

साहित्य – रिकामे खोके. राखाडी रंगाचा कागद, गोंद, शिसपेन्सिल, पट्टी, गडद राखाडी रंग, ब्रश, उभा मग.

कृती – एक किलो मिठाई मावेल असे रिकामे खोके घ्या. त्याच्या पृष्ठभागावर एक राखाडी कागद गोंदाने चिकटवा. कागदावर दर २ सेंटीमीटर अंतरावर उभ्या आणि आडव्या रेघा आखा. त्यामुळे चौकटी तयार होतील. कागदाच्या रंगापेक्षा जरा गडद राखाडी रंगछटा तयार करा. एकाआड एक चौकट गडद राखाडी रंगाने रंगवा. हे खोके टेबलवर ठेवा. ज्या दिशेने उजेड येत असेल त्या दिशेच्या कोपर्‍याच्या बाजूला या खोक्यावर एक उभा मग पालथा ठेवा. मगाच्या सावलीत दिसणारी गडद राखाडी चौकट सावलीत नसणार्‍या गडद चौकटीपेक्षा फिकट रंगाची दिसेल.
सावलीत प्रकाश कमी असल्यामुळे रंगछटा फिक्या दिसतात. 

145.                   उत्तर सहा हजार एकशे चौर्‍याहत्तर.
साहित्य – कागद, पेन किंवा पेन्सिल.
कृती – एक चार अंकी संख्या घ्या. अट एकच चारही अंक एक सारखे नकोत. शून्य असले तरी चालेल. एक अंक दोनदा, तीनदा असला तरी चालेल. या चार अंकी संख्येतले अंक उतरत्या क्रमाने लावा ती संख्या कागदावर लिहा. हेच चार अंक चढत्या क्रमाने लावा आणि ही संख्या आधीच्या संख्येतून वजा करा. वजाबाकी चार अंकी येईल. ही चार अंकी संख्या घेऊन त्यातले चार अंक उतरत्या क्रमाने लावा ती संख्या कागदावर लिहा. हेच चार अंक चढत्या क्रमाने लावा आणि ही संख्या आधीच्या संख्येतून वजा करा. असे करत करत एक वेळ अशी येईल की तुम्हाला ६१७४ हेच उत्तर मिळेल.
६१७४ या क्रमांकाला कापरेकर स्थिरांक म्हणतात

144.                   उत्तर चारशे पंचाण्णव.
साहित्य – कागद, पेन किंवा पेन्सिल.
कृती – एक तीन अंकी संख्या घ्या. अट एकच तीनही अंक एक सारखे नकोत. शून्य असले तरी चालेल. एक अंक दोनदा असला तरी चालेल. या तीन अंकी संख्येतले अंक उतरत्या क्रमाने लावा ती संख्या कागदावर लिहा. हेच तीन अंक चढत्या क्रमाने लावा आणि ही संख्या आधीच्या संख्येतून वजा करा. वजाबाकी तीन अंकी येईल. ही तीन अंकी संख्या घेऊन त्यातले तीन अंक उतरत्या क्रमाने लावा ती संख्या कागदावर लिहा. हेच तीन अंक चढत्या क्रमाने लावा आणि ही संख्या आधीच्या संख्येतून वजा करा. असे करत करत एक वेळ अशी येईल की तुम्हाला ४९५ हेच उत्तर मिळेल.
४९५ या क्रमांकाला कापरेकर स्थिरांक म्हणतात.

143.                   मुंग्यांनो चले जाव.
साहित्य – साखर, बोरॅक्स, मध, पाणी, भांडे.
कृती – एका भांड्यात एक चमचाभर बोरॅक्स घाला. त्यातच तीन चमचे साखर घाला. हे मिश्रण एकजीव होईपर्यंत घोटा. त्यात थोडे थोडे पाणी घाला. हा पाक साधारण घट्ट होईल. त्यात एक चमचा मध घालून पाक प्रवाही होऊ द्या. मुंग्यांच्या जाण्यायेण्याच्या रस्त्यावर या पाकाचे थेंब थेंब टाका. हळुहळू मुंग्या थेंबांकडे आकर्षित होतील. थेंबाची चव घेतील. थेंब घेऊन वारूळात जातील आणि परत येणार नाहीत.
बोरॅक्समुळे मुंग्याच्या अंगातील पाणी कमी होऊन त्या अशक्त होतात.

142.                   झुरळांनो चले जाव.
साहित्य – कणिक, बोरीक पावडर, गूळ, पाणी, भांडे.
कृती – एका भांड्यात एक डावभर कणिक घ्या. त्यात अर्धा डाव गूळ घाला. तसेच त्यात पाव डाव बोरीक पावडर घाला. कॅरमचा पृष्ठभाग गुळगुळीत राखण्यासाठी बोरीक पावडर वापरतात. हे सारे मिश्रण थोडे थोडे पाणी घालून एकजीव करा. या मिश्रणाचे छोटे छोटे गोळे करा. झुरळांच्या जाण्यायेण्याच्या वाटेवर थोड्या थोड्या अंतरावर संध्याकाळी गोळे ठेवा. दुसर्‍या दिवशी सकाळी झुरळांचा वावर कमी झालेला दिसेल. या गोळ्यांचा प्रभाव पाच-सहा महिने राहातो.
बोरीक पावडरमुळे झुरळांच्या अंगातील पाणी कमी होऊन ती अशक्त होतात. माणसांना तसेच अन्य पाळीव प्राण्यांना फारसा त्रास होत नाही.

141.                   पाण्यापासून हैड्रोजन आणि ऑक्सिजन.
साहित्य – शिसपेन्सिली, टोकयंत्र, पाण्याच्या बाटल्या, प्लॅस्टिक ट्यूब, गोंद, वीजवाहक तारा, फुगे, बॅटरी.
कृती – दोन शिसपेन्सिली घ्या. त्यांच्या दोन्ही टोकांना टोकयंत्राने टोके काढा. दोन प्लॅस्टिकच्या बाटल्या घ्या. त्यांना मध्य उंचीवर एक एक भोक पाडा. भोकातून २-३ सेंटीमीटरचा प्लॅस्टिकच्या नळीचा तुकडा टाकून गोंदाने पक्का बसवून दोन्ही बाटल्या जोडा. त्यात कोठेही फट राहाता कामा नये. झाकणे काढून घ्या. एका बाटलीत पाणी ओता. नळीने बाटल्या जोडलेल्या असल्यामुळे पाणी दुसर्‍या बाटलीत जाईल. पाऊण उंचीपर्यंत पाणी भरा. पाण्याच्या पातळीच्या वरच्या भागातून एकेका बाटलीत एकेक पेन्सिल खुपसा. बाटलीच्या तोंडांवर एकेक फुगा लावा. एक नऊ व्होल्टची बॅटरी घेऊन त्याची दोन टोके वीजवाहक तारांनी दोन पेन्सिलींच्या बाहेरच्या बाजूंना जोडा. पेन्सिलिंच्या बाटलीतील टोकांमधून वायूंचे बुडबुडे यायला लागतील. धन अग्राकडून ऑक्सिजन तर ऋण अग्राकडून हैड्रोजन वायू बाहेर पडल्याचे आढळेल. 

140.                   वार्‍याचा वेग पहा !
साहित्य – आपला परिसर.
कृती – आपल्या परिसरात अनेक वस्तू असतात. त्यांच्यावर वाहणार्‍या वार्‍याचा प्रभाव पडतो. वार्‍याच्या जोरामुळे वस्तू हालतात. हलक्या वस्तू कमी जोराच्या, कमी वेगाच्या वार्‍यानेसुद्धा हलतात. तर अवजड वस्तू हलायला जोराचा वारा लागतो. पुढे दिलेल्या निरीक्षणांचा वापर करून कंसात दिल्याप्रमाणे वाहाणार्‍या वार्‍याच्या ताशी वेगाचा अंदाज करा.


निरीक्षण
वार्‍याचा वेग
धूर सरळ वर जातो
०-२ किमी
धूर तिरपा पसरतो
२-५ किमी
चेहेर्‍यावर वारा जाणवतो
५-१२ किमी
झाडांची पाने सळसळतात
१२-२० किमी
कागद भिरकावले जातात
२०-३० किमी
झाडे हलतात
३०-४० किमी
अंगावरील साडीचापदर, दुपट्टा उडतो
४०-५० किमी
छत्री पलटी होते
५०-६० किमी
वार्‍याच्याविरूद्ध चालणे कठीण होते
६१-७४ किमी
छपरावरील कौले उडतात
७५-८९ किमी
इमारतींना हानी पोचते
९०-१०३ किमी
परिसराचे नुकसान
१०४-१२० किमी139.                   वार्‍याचा वेग मोजा ! (टेटेचेंडू)
साहित्य – आपला परिसर, फूटपट्टी, खिळा, कोनमापक, दोरी, टेबल टेनिसचा चेंडू, चिकटपट्टी.
कृती – एक फूटपट्टी घ्या. तिच्या मध्यभागी खिळ्याने एक भोक पाडा. एक कोनमापक घ्या. त्याच्या शून्य बिंदूवर खिळ्याने एक भोक पाडा. फूटपट्टी आणि कोनमापक भोकापाशी जोडून दोरीने गाठ मारून पक्के बांधा. याच दोरीला २५ सेंटीमीटर अंतरावर एक टेबल टेनिसचा चेंडू चिकटपट्टीने जोडा. ४ सेटीमीटर व्यास आणि सुमारे ३ ग्रॅम वजन असलेला चेंडूही चालेल. उरलेली दोरी कापून टाका. ही मांडणी घराबाहेर उघड्यावर एका आडव्या सळईला पक्की बांधा. वारा आला की त्याच्या जोराने चेंडू हालेल, तो किती कोनात हालतो त्यावरून वार्‍याचा ताशी किलोमीटर वेग किती ते पहा.


कोन अंशात
वेग ताशी कि.मी.
९०
९५
१००
१३
१०५
१६
११०
१९
११५
२१
१२०
२४
१२५
२६
१३०
२९
१३५
३१
१४०
३४
१४५
३७
१५०
४१
१५५
४६
१६०
५२138.                   पुठ्ठ्याचा वातकुक्कुट!
साहित्य – आपला परिसर, प्लॅस्टिकची बाटली, सायकलचा स्पोक, वाळू, पुठ्ठा, कागद, पाते, स्केचपेने, स्ट्रॉ, गोंद,
कृती – एक मोठी प्लॅस्टिकची बाटली घ्या. तिच्या झाकणाला सायकलच्या स्पोकने भोक पाडा. झाकण काढून घ्या. बाटलीत स्पोक ठेवून त्याभोवती वाळू भरा. बाटलीतली वाळू ठाकून-ठोकून पक्की बसवा. स्पोक मधोमध राहिला पाहिजे. बाटलीचे झाकण लावा. एक वहीचा पुठ्ठा घ्या त्याच्या मध्यावर भोक पाडून त्यातून ओवून पुठ्ठा बाटलीच्या झाकणावर गोंदाने चिकटवा. चार दिशांची नावे चार कागदांवर लिहून ते कागद पुठ्ठ्याच्या चार टोकांना चिकटवा. एका स्ट्रॉला मधोमध भोक पाडा. स्ट्रॉच्या एका बाजूला कागदाचा ४ सेंटीमीटरचा चौरस चिकटवा तर दुसर्‍या बाजूला २ सेंटीमीटर लांबीचा त्रिकोण चिकटवा. ही स्ट्रॉ एका संपलेले स्केचपेन रिकामे करून टोक खाली करून तिच्या मध्यभागी आडवी चिकटवा. हे सारे बाटलीत ठेवलेल्या स्कोपवर ठेवा. हा वातकुक्कुट तयार झाला तो घराबाहेर, सज्जात, अंगणात दिशा पाहून नीट ठेवा. वारा वाहील तसा हा वार्‍याची दिशा दाखवेल.

137.                   वार्‍याची दिशा आणि वेग ! (वायूसूचक)

साहित्य – आपला परिसर, एक जुना पूर्ण बाहीचा सदरा, कात्री, पेन्सिल, लाल रंग, काठी, तारा.
कृती – आपल्या घरातला एक मोठ्यात मोठा जुना पूर्ण बाह्यांचा सदरा घ्या. कात्रीने कापून त्याची बाही सदर्‍यापासून अलग करून घ्या. बाहीची लांबी मोजा. तिचे लांबीत समान पाच भाग पेन्सिलीने आखा. १, २ आणि ५ या भागांना लाल रंग लावा. बाही कापलेल्या बाजूला सहा भोके पाडून त्यांतून जाड तारा ओवा. त्या तारा एका काठीच्या वरच्या टोकाला बांधा. काठी घराच्या छपरावर उभारा. बाही वार्‍याने फडफडेल त्यावरून वार्‍याचा जोर आणि वार्‍याची दिशा समजून येईल. याला वायूसूचक म्हणतात.

136.                   केसाने हवेतील आर्द्रता मोजा.
साहित्य – आपला परिसर, जाड कागद, पाते, दोन ड्रॉइंगच्या पिना, पुठ्ठा, लांब केस, पेन.
कृती – जाड कागदाची १५ सेंटीमीटर लांब आणि ३ सेंटीमीटर रुंद पट्टी कापून घ्या. पट्टीच्या एका बाजूकडून ६ सेंटीमीटर अंतरावर मध्यभागी ड्रॉईंग पीनने एक भोक पाडा. दुसर्‍या बाजूला त्रिकोणी काप देऊन टोक काढा. त्याच्या विरुद्ध बाजूला एका टोकापासून एक-एक सेंटीमीटर अंतर सोडून एक भोक पाडा. भोकाला एक लांब कोरडा केस बांधा. आत ही पट्टी एका मोठ्या उभ्या पुठ्ठ्याच्या वरच्या बाजूला थोडी खाली अशी ड्रॉइंगपिन लावून पाडलेल्या भोकाचा वापर करून बसवा. दुसरी ड्रॉइंगपिन पुठ्ठ्याच्या खालच्या बाजूला टोचा आणि त्याला लांब केसाचे लोंबकाळते टोक गुंडाळा. पुठ्ठ्यावरील पट्टीच्या टोकासमोर मिलिमीटरच्या खुणा करा. हवेत आर्द्रता वाढली की केस लांबेल आणि पट्टीचे टोक खालच्या रेघांकडे सरकेल, आर्द्रता कमी झाली की केसाची लांबी कमी होईल आणि टोक वरच्या दिशेला सरकेल. आपले केस कोरड्या हवेत आखूड होतात तर दमट हवेत लांबतात
 
135.                   झटपट बर्फाचा गोळा.
साहित्य – पाण्याची बाटली, पाणी, बशी, रंगीबेरंगी पाक, फ्रिज.
कृती – फ्रिज सर्वाधिक थंड होण्याच्या स्थितीत ठेवा. एक पाण्याची बाटली पाण्याने पूर्ण भरा. झाकण लावून फ्रिझरमध्ये ठेवा. दोन तास झाल्यानंतर बाटली धक्का न लावता बाहेर काढा. त्यात अतिथंड झालेले पाणी असेल. एक बशी घ्या. अतिथंड झालेले पाणी किचित झटका देवून बशीच्या मध्यभागी ओता. त्याचा बर्फाचा गोळा होईल. आणखी अतिथंड पाणी ओतत त्याला हवा तेवढा आकार येऊ द्या. त्यावर थोडा थोडा रंगीबेरंगी पाक ओतत तुम्हाला हवा तसा गारेगार बर्फाचा गोळा करा. स्वत: केलेला, स्वच्छ पाण्याच्या बर्फाचा, घरातली आरोग्यपूर्ण सरबते घालून केलेला गारेगार गोळा खाताना आणखीच मजा येईल.
तापमान शून्य अंश सेल्सियसपेक्षा कमी झाले तरी पाणी द्रव रुपात राहू शकते. एखाद्या ठिकाणी त्याचे रुपांतर बर्फात झाले की बाकीचे अतिथंड पाणीही झटकन बर्फरूप घेते.

134.                   किती वेळा चेंडू कोठे?
साहित्य – मोठा पुठ्ठा, छोटा चेंडू, चेंडूपेक्षा थोडे मोठे खिळे, हातोडी, कागद, स्केच पेन.
कृती – एक मोठा पुठ्ठा घ्या. तो उभा धरा. त्याच्या खालच्या बाजूला चार सेंटीमीटर रुंदीची कागदी पट्टी चिकटवा. पट्टीच्या लांबीच्या मधोमध पट्टीच्या वरच्या बाजूवर हातोडीने एक खिळा ठोका. चेंडूपेक्षा किंचित जास्त अंतर ठेवत मधल्या खिळ्याच्या दोन्ही बाजूंना चार चार खिळे पुठ्ठ्यावर ठोका. खिळ्यांपासून पुठ्ठ्याच्या खालच्या कडेपर्यंत स्केच पेनने रेषा ओढा. नऊ खिळ्यांच्या रांगेच्या वर आठ, सात, सहा असे करत एक खिळा आकृतीप्रमाणे ठोका. पुठ्ठा भिंतीला तिरपा टेकवूल ठेवा. सर्वाच वरच्या खिळ्यावर चेंडू टेकवून हात काढा. चेंडू खिळ्यांच्या मधून मधून पडत पाढर्‍या पट्टीच्या एका खान्यातून बाहेर पडेल. तेथे स्केच पेनने टिकलीएवढा ठिपका काढा. असे किमान शंभर वेळा करून कोणत्या खान्यात किती वेळा चेंडू पोचतो ते तपासा.
याला वारंवारीता चित्र म्हणतात.


133.                   किती वेळ कोण कोठे?
साहित्य – तुमच्या परिसराचा नकाशा, स्केच पेन बॉक्स, घड्याळ.
कृती – तुमच्या परिसराचा एक नकाशा घ्या. नसेल तर अंदाजाने तयार करा. त्यात तुम्ही आणि तुमच्या घरचे दिवसभरात कुठे कुठे जाऊ शकतात ती ठिकाणे असली पाहिजेत. या नकाशात तुमच्या घरातल्या प्रत्येक व्यक्तिची जागा दर १५व्या मिनिटाला कोठे आहे ते दाखवायचे आहे. प्रत्येक व्यक्तिसाठी वेगळी खूण करा. नावातले पहिले अक्षर वापरले तरी चालेल. सकाळी ६ पासून सुरुवात करायची. दर तासाला रंग बदलायचा. सकाळी ६-तांबडा, ७-नारंगी, ८-केशरी, ९-पिवळा, १०-पोपटी, ११-हिरवा, दुपारी १२-शेवाळी, १-निळा, २-मोरपंखी, ३-आकाशी, ४-पारवा, ५-करडा, संध्याकाळी ६-जांभळा, ७-गुलाबी, ८-विटकरी, ९-तपकिरी, १०-काळा.
अशा चित्राला वितरण आलेख म्हणतात.

132.                   चक्रावरची गंमत
साहित्य – बागेतले आडवे चक्र. पाण्याने भरलेल्या बाटल्या, चक्र फिरवण्यासाठी सोबती.
कृती – बागेत खेळण्यासाठी वापरले जाणारे आडव्यात गोल गोल फिरणारे चाक निवडा. त्याच्या मध्यभागी उभे रहा. तुमच्या प्रत्येक हातात पाण्याने भरलेली बाटली घ्या. हात लांब करून उभे रहा. सोबत आलेल्यांना चाकाला गती द्यायला सांगा. चाक गतीत फिरायला लागले की तुमचे हात अंगाजवळ आणा. मग पुन्हा लांब करा. फिरण्याच्या गतीत पडणारा फरक अनुभवा.
चक्राकार गतीत फिरणार्‍या वस्तूतल्या वजनाची रचना बदलली की तिचा जडपणा बदलतो. वजन मध्याकडे आले की चक्राकार गती वाढते, वजन लांब गेले की गती कमी होते.

131.                   उसळू दे चेंडू जोरात !
साहित्य – एक मोठा चेंडू, एक छोटा चेंडू.
कृती – एक मोठा चेंडू घ्या. तो जमिनीवर फेका. टप पडल्यावर ते किती उसळतो ते पहा. आता एक छोटा चेंडू घ्या. तो जमिनीवर फेका. टप पडल्यावर ते किती उसळतो ते पहा. आता एका हातात मोठा चेंडू घ्या, त्या चेंडूच्या वरच्या टोकावर छोटा चेंडू ठेवा. तो दुसर्‍या हाताने धरून ठेवा. दोन्ही चेंडू एकदम जमिनीवर फेका. मोठा चेंडू आणि छोटा चेंडू यांच्या उसळीत पडलेला फरक पहा.

मोठ्या चेंडूच्या टप्प्यातून उसळून येणारी ऊर्जा छोट्या चेंडूला दिली जाते त्यामुळे तो जास्त उसळतो तर मोठा कमी उसळतो.

130.                   बर्फाच्या ट्रेची बॅटरी प्रकार २.
साहित्य – लोखंडी खिळे, तांब्याची तार, बर्फाचा ट्रे, पाणी, व्हिनेगार, चमचा, एल ई डी दिवा.
कृती – एक २ सेंटीमीटर लांबीचा लोखंडी खिळा घ्या. तांब्याच्या तारेचा ३ सेंटीमीटर लांबीचा तुकडा घ्या. त्याच्या एका टोकाला वर्तुळाकार आकडा तयार करा. हा आकडा खिळ्याच्या डोक्याखाली अडकवा. अशा प्रकारे तांब्याचा फासा लावलेले अनेक लोखंडी खिळे तयार करा. फ्रिजमध्ये वापरतात तो बर्फाचा ट्रे घ्या. त्याच्या शेजार शेजारच्या सहा खणात पाणी घाला. त्यात एक एक चमचा व्हिनेगार घाला. ट्रेचे कप्पे ओसंडून वाहून जायला नकोत. फासेवाला खिळा घ्या. लोखंडी खिळा एका कप्प्यात आणि त्याला जोडलेली तांब्याची तार शेजारच्या दुसर्‍या कप्प्यात राहील अशी ठेवा. अशाच प्रकारे दुसर्‍या कप्प्यात खिळा आणि त्याची तार तिसर्‍या कप्प्यात, तिसर्‍या कप्प्यातल्या खिळ्याची तार चौथ्या, चौथ्याची पाचव्या, पाचव्याची सहाव्या असे खिळे रचा. सहाव्या आणि पहिल्या कप्प्यात मिळून एल ई डी दिवा ठेवा. तो उजळेल. न उजळल्यास तो पहिल्या आणि सहाव्या कप्प्यात ठेवा.

129.                   बर्फाच्या ट्रेची बॅटरी प्रकार १.
साहित्य – वाया गेलेला मोठा सेल, तांब्याची तार, बर्फाचा ट्रे, पाणी, मोरी साफ करायचे अॅसिड, ड्रॉपर, एल ई डी दिवा.
कृती – वाया गेलेला मोठा विजेचा सेल घ्या. तो फोडून त्याच्या आत असणारा जस्ताचा पत्रा सरळ करून घ्या. त्याचे दाभणासारखे उभे काप करा. तांब्याच्या तारेचा ३ सेंटीमीटर लांबीचा तुकडा घ्या. त्याचे एक टोक जस्ताच्या दाभणात अडकवा. अशी अनेक दाभणे तयार करा. फ्रिजमध्ये वापरतात तो बर्फाचा ट्रे घ्या. त्याच्या शेजार शेजारच्या सहा खणात पाणी घाला. त्यात चार चार थेंब अॅसिड घाला. ट्रेचे कप्पे ओसंडून वाहून जायला नकोत. जस्ताचे दाभण एका कप्प्यात आणि त्याला जोडलेली तांब्याची तार शेजारच्या दुसर्‍या कप्प्यात राहील अशी ठेवा. अशाच प्रकारे दुसर्‍या कप्प्यात दाभण आणि त्याची तार तिसर्‍या कप्प्यात, तिसर्‍या कप्प्यातल्या दाभणाची तार चौथ्या, चौथ्याची पाचव्या, पाचव्याची सहाव्या असे खिळे रचा. सहाव्या आणि पहिल्या कप्प्यात मिळून एल ई डी दिवा ठेवा. तो उजळेल. न उजळल्यास तो पहिल्या आणि सहाव्या कप्प्यात ठेवा.

128.                   मिठाच्या पाण्याची बॅटरी प्रकार २.
साहित्य – शीतपेयाचा रिकामा डबा, वाया गेलेली सायकलची ट्यूब, कात्री, तांब्याचा पत्रा, पाण्याची प्लॅस्टिकची बाटली, पाते, मीठ, क्लिपा, विजेच्या तारा, एल ई डी दिवा.
कृती – शीतपेयाचा एक रिकामा डबा घ्या. त्याचा वरचा रंग खरवडून काढून डब्याचे अॅल्युमिनियम दिसू द्या.  वाया गेलेली सायकलची ट्यूब घ्या. एका कात्रीने ट्यूबच्या रबराच्या चकत्या कापा. शीतपेयाच्या डब्याच्या वरच्या आणि खालच्या बाजूने एक एक सेटीमीटर जागा सोडून रबराची एक एक चकती लावा. त्या चकत्यांवर आणखी पाच-सहा चकत्या लावा. या चकत्यांच्या बाहेरून तांब्याच्या पत्र्याचा एक दंडगोल जोडा. त्यालाही बाहेरून दोन रबरी चकत्या लावा. एक पाण्याची निम्म्यावर आडवी कापा. त्यात मीठाचे पाणी भरा, जोडलेले डबे त्यात ठेवा. एल ई डी दिव्याला दोन क्लिपांना विजेच्या तारा लावून एक क्लिप तांब्याला आणि दुसरी अॅल्युमिनियमला जोडा. दिवा पेटेल. याचा उपयोग करून विजेच्या अन्य उपकरणांचा वापर करून पहा.

127.                   मिठाच्या पाण्याची बॅटरी प्रकार १.
साहित्य – कोळशाची बारीक पूड, पातळ फडकी, मॅग्नेशियमची तार, मीठाचे पाणी, क्लिपा, विजेच्या तारा, एल ई डी दिवा.
कृती – एक वीतभर लांब पातळ फडके घ्या. ते मिठाच्या पाण्यात ओले करून पिळून घ्या. त्याच्या मध्यभागावर कोळशाची बारीक पूड पसरा. एक विजेची तार घ्या. तिच्यावरचा प्लॅस्टिकचा थर साधारण चार सेंटीमीटर इतका काढून टाका. आतील तांब्याच्या तारा पिसार्‍यासारख्या कोळशाच्या पुडीवर ठेवा. त्याच्यासकट फडके गुंडाळून त्याची वळकटी करा. वळकटीला वरच्या बाजूने मॅग्नेशियमची तार सर्पाकार गुंडाळा. फडके पुन्हा मिठाच्या पाण्याने ओले करा. क्लिपा विजेच्या तारा आणि एल ई डी दिवा जोडा. दिवा प्रकाशेल.   

126.                   हातातून वीजनिर्मिती
साहित्य – जाड प्लॅस्टिकचे पॅड किंवा लाकडी फळी, अॅल्युमिनियमचा पत्रा, तांब्याचा पत्रा, वीजमापक यंत्र (व्होल्टमीटर), क्लिपा, विजेच्या तारा.
कृती – एक जाड प्लॅस्टिकचे पॅड घ्या. लाकडी फळी घेतली तरी चालेल. साधारण १० सेंटीमीटर लांब आणि ६ सेंटीमीटर रुंद असलेला अॅल्युमिनियमचा पत्रा घ्या. तो पॅडच्या एका कडेला ठेवा. त्याला क्लिप लावून तिचे दुसरे टोक वीजमापक यंत्राला जोडा. याच मापाचा तांब्याचा पत्रा घेऊन तो पॅडच्या दुसर्‍या कडेला ठेवून तोही वीजमापक यंत्राला जोडा. आता तुमचा एक तळहात अॅल्युमिनियमच्या पत्र्यावर व दुसरा तळहात तांब्याच्या पत्र्यावर ठेवा. वीजमापकात पहा तुमच्या हातामुळे निर्माण झालेली वीज किती व्होल्ट आहे?. बाकीच्यांनाही हीच कृती करायला सांगा. त्यांच्यात किती व्होल्ट वीज दिसते?

125.                   शिपाई मुंगी ओळखा.
साहित्य – मुंग्याची रांग, रुमाल
कृती – एका रांगेने चालणार्‍या मुंग्याचे निरीक्षण करा. एका मागोमाग जाणार्‍या मुंग्या आणि समोरासमोर येणार्‍या मुंग्या एकमेकींशी कसे वागतात ते पहा. यात काही कामकरी मुंग्या आहेत तर काही शिपाई मुंग्या आहेत. त्यांच्या आकारात किंवा रंगरूपात काही फरक दिसतो का ते पहा. शिपाई मुंग्या ओळखण्यासाठी एक परिक्षा घ्या. एक रुमाल थोडा ओला करा. रुमालाच्या ओल्या भागाचा वापर करून सुमारे ४-५ सेंटीमीटर लांबीचा मुंग्याचा रस्ता पुसा. पुन्हा नीट निरीक्षण करा. कामकरी मुंग्या भांबावलेल्या दिसतील तर शिपाई मुंग्या रस्ता पुन्हा तयार करतील.
एका वारुळातल्या मुंग्या एका विशिष्ट प्रकारची रसायने सोडत जातात त्यांना फेरोमेन्स म्हणतात. ते त्यांचे रस्ते होतात. अनुभवी मुंग्या मोडलेले रस्ते पडकन जोडताना दिसतात. 

124.                   छोटे मोठे, मोठे छोटे.
साहित्य – दोन सारखी केळी, ट्रे, टेबल.
कृती – एकाच घडातली दोन अगदी सारखी केळी घ्या. केळ्यांचा वाकडेपणाही सारखा असावा. आता एक ट्रे घ्या. तो एका टेबलवर ठेवा. ट्रेच्या मध्यावर एक केळे आडवे ठेवा. केळ्याची टोके आपल्या बाजूला असायला पाहिजेत. आता दुसरे केळे आधीच्या केळ्यापासून एक बोट अंतरावर ट्रेवरच ठेवा. त्याचीही टोके आपल्या बाजूला असायला हवीत. आपल्या जवळचे केळे वरच्या केळ्यापेक्षा मोठे दिसते. केळ्यांच्या जागांची अलटापालट करून पहा. तरीही जवळचे केळेच दुसर्‍या वरच्या केळ्यापेक्षा मोठे दिसते.
जवळच्या केळ्याचा बहिर्वक्र भाग त्याच्या वरच्या केळ्याच्या अंतर्वक्र भागापेक्षा लांबट असल्याने जवळचे केळे मोठे भासते.

123.                   कोणत्या प्रकारची तरफ?
साहित्य – कोका कोला सारख्या शितपेयाचा कॅन.
कृती – कोका कोला किंवा अन्य कोणत्याही शितपेयाचा भरलेला कॅन घ्या. तो उघडण्यासाठी असलेली क्लिप नीट पहा. ती एक तरफ आहे. ती कोणत्या प्रकारची तरफ आहे?. तरफेचे तीन प्रकार होतात. भार आणि बल यांमध्ये टेकू असला की प्रकार एक. भार मध्ये असला की प्रकार दोन आणि बल मध्ये असले की प्रकार तीन. कॅनची कळ वर ओढताना बल एका टोकाला लावले जाते, रिवेटवर आतून दाब येतो मग कळीचे दुसरे टोक झाकणाचा पत्रा फाडते तेव्हा रिवेटचा टेकू होतो आणि पहिल्या प्रकारची तरफ बनते. अशा तर्‍हेने आधी प्रकार दोनप्रमाणे उघडणारी कळ निम्या कार्यानंतर प्रकार एकची होते. रचनेची कमाल आहे.

122.                   त्रिकोणाचे क्षेत्रफळ.
साहित्य – वहीचा पुठ्ठा, कात्री, आलेखाचा कागद, गोंद, पेन्सिल, ड्रॉईंगच्या पिना, रबर, टाचणी
कृती – एका वापरून झालेल्या वहीचा जाड पुठ्ठा घ्या. त्यावर एक आलेखाचा कागद चिकटवा. आलेखाच्या कागदाच्या एका कडेपासून १ सेंटीमीटर अंतरावर पेन्सिलिने रेघ ओढा. रेघेवर दोन्ही टोकांकडून १ सेंटीमीटर जागा सोडून दोन ड्रॉईंगच्या पिना खुपसा. दोन्ही पिनांभोवती एक रबर बँड ताणून बसवा. आलेखाच्या कागदावर कोठेही एक ड्रॉईंगची पिन टोचा. रबर बँडची वरचा बाजू या पिनेत अडकवून एक त्रिकोण करा. आलेखावरच्या चौरसांच्या सहाय्याने त्रिकोणाचे क्षेत्रफळ मोजा. पाया तेवढाच ठेवत वेगवेगळी उंची घेत मापने करा.
त्रिकोणाचे क्षेत्रफळ पाया आणि उंची यांच्या गुणाकाराच्या निम्मे असल्याचे आढळते का तपासा.

121.                   गरम जड की गार जड?
साहित्य – सारख्या तोंडाच्या २ बाटल्या, कोमट पाणी, गार पाणी, लाल शाई, निळी शाई, जाड प्लॅस्टिकचा तुकडा.
कृती – एका बाटलीत चार थेंब लाल शाई टाका. मग ती बाटली गार पाण्याने काठोकाठ भरा. पाणी लाल दिसेल. मग बाटलीच्या तोंडावर एक जाड प्लॅस्टिकचा तुकडा ठेवा. दुसर्‍या बाटलीत चार थेंब निळी शाई टाका. मग ती बाटली कोमट पाण्याने काठोकाठ भरा. लाल पाण्याची बाटली प्लॅस्टिकचा तुकडा पक्का ठेवत उलटी करा. निळ्या पाण्याच्या बाटलीच्या तोंडावर ठेवा. बाटल्यांची जागा न हलवता हलकेच प्लॅस्टिकचा तुकडा काढून घ्या. लाल शाईचे पाणी निळ्या पाण्यात मिसळते का पहा. हीच कृती लाल पाणी खालच्या बाटलीत आणि निळे वरच्या बाटलीत असे करून पहा. निळे कोमट पाणी खाली येते का वर जाते?

कोमट पाणी हलके तर गार पाणी जड असते त्यामुळे निळे पाणी वर व लाल खाली जाईल.120.                   लोखंड, अॅल्युमिनियम आणि लोहचुंबक.
साहित्य –  अॅल्युमिनियमची नळी, लोखंडाची नळी, लोहचुंबक.
कृती – एक गोलाकार लोहचुंबक घ्या. एक लोखंडाची नळी घ्या. तिचा घेर लोहचुंबकापेक्षा थोडा मोठा असला पाहिजे. लोखंडाची नळी उभी धरा. लोखंडाच्या नळीला लोहचुंबक लावा, तो तिला चिकटून बसतो हे तपासा. लोखंडाच्या नळीच्या तोंडातून लोहचुंबक खाली सोडा. तो सरळ खाली येतो की आत चिकटून घरंगळत खाली येतो ते पहा. लोहचुंबक वरून खाली येण्यासाठी लागणारा वेळ मोजा. आता अॅल्युमिनियमची नळी घ्या. तिला लोहचुंबक लावा, तो तिला चिकटून बसत नाही हे तपासा. अॅल्युमिनियमच्या नळीच्या तोंडातून लोहचुंबक खाली सोडा. तो सरळ खाली येतो की आत चिकटून घरंगळत खाली येतो ते पहा. लोहचुंबक वरून खाली येण्यासाठी लागणारा वेळ मोजा.
अॅल्युमिनियम चुंबकाकडे आकर्षित होणारा धातू नाही तरीही त्यातून येताना तेथे निर्माण होणार्‍या एडी प्रवाहामुळे चुंबक खाली यायला अधिक वेळ लागतो. 

119.                   प्लॅस्टिक, अॅल्युमिनियम आणि लोहचुंबक.
साहित्य –  प्लॅस्टिकची नळी किंवा अँगल, अॅल्युमिनियमचा पत्रा, धारदार पाते, लोहचुंबक.
कृती – जाड प्लॅस्टिकची सुमारे एक मीटर लांबीची नळी किंवा अँगल घ्या. तिला लोहचुंबक लावून ते नळीला चिकटून बसत नाही हे तपासा. एका धारदार पात्याच्या सहाय्याने नळी उभी चिरून तिचे पन्हाळीसारखे दोन भाग करा. पन्हाळ किंवा अँगल हातात आडवा धरा. त्याला थोडा उतार देवून त्यात लोहचुंबक ठेवून तो एका टोकाकडून दुसर्‍या टोकाकडे जायला लागणारा वेळ मोजा. अॅल्युमिनियमचा सुमारे 30 सेंटिमीटर लांबीचा पत्रा कापा. पन्हाळ किंवा अँगलच्या दोन्हीकडे समान अंतर ठेवत तो पत्रा नीट बसवून घ्या. आता अॅल्युमिनियमचा पत्रा लावलेली पन्हाळ वापरून वरीलप्रमाणे लोहचुंबक एका टोकापासून दुसर्‍या टोकाकडे सोडा. निरिक्षण करा.
अॅल्युमिनियमच्या पत्र्याच्या भागातून जाताना एडी प्रवाहामुळे लोहचुंबकाचा वेग कमी होतो.

118.                   साबणावर चालणारी होडी.
साहित्य – कागद, पाते, साबणाची पूड, पाणी, टब.
कृती – एका टबमध्ये पाणी भरा. एक कागद घ्या. पात्याचा वापर करून कावळ्याच्या पायाच्या आकारासारखा आकार कापा. ही झाली आपली होडी. (ती इंग्रजीतल्या उलट्या वाय अक्षरासारखी दिसेल). ती हलकेच टबमध्ये सोडा. होडीच्या आकाराच्या मध्यभागी दोन बोटे असल्यासारख्या भागातल्या पाण्यात एक चिमूट साबणाची पूड टाका. ती पाण्यात विरघळेल तशी ही होडी पुढे पुढे सरकेल.
साबणामुळे पाण्याचा पृष्ठभाग ताणला जातो आणि होडी पुढे ढकलली जाते

117.                   आगीविना जाळ.
साहित्य – चिंगमची चांदी, कात्री, विजेचा घट किंवा सेल, रुमाल.
कृती – एक चिंगम घ्या. त्याच्यावरची चांदी काढून घ्या. चिंगमची चांदीच्या एका बाजूला चकचकीत धातूचा पातळ थर असतो तर दुसर्‍या बाजूला कागद. या चांदीची एक सेंटीमीटर लांबीची पट्टी कात्रीने कापून घ्या. तिच्या मध्यावरचा भाग कात्रीने कापून आणखी अरुंद करा. एका हातावर रुमाल टाका. त्या हाताच्या अंगठ्यात आणि मधल्या बोटात एक विजेचा घट किंवा सेल आडवा ठेवा. त्याच्या धन बाजूला कापलेल्या पट्टीचे एक टोक लावा ऋण बाजूला दुसरे टोक लावा. चिंगमच्या चांदीच्या पट्टीची चकचकीत बाजू घटाच्या किंवा सेलच्या टोकाला लागलेली असली पाहिजे. त्यातून वीजप्रवाह वाहू लागेल. पट्टीचा चिंचोळा भाग तापेल आणि पेटेल. पेटल्यावर आपोआप वीजप्रवाह थांबेल.
वीजप्रवाह वाहताना अरुंद भाग त्याला अधिक अवरोध करतो म्हणून तापतो. जास्त तापला की पेट घेतो.

116.                   दिशा बदलणारा लंबक.
साहित्य – जाड कागद, कंपास, कात्री, कोनमापक, स्केच पेन , नायलॉनची लांब दोरी रबरी चेंडू, मणी, लोखंडी पातळ तार, आकडा, कोनमापक,
कृती – एका जाड कागदावर ३० सेंटीमीटर व्यासाचे एक वर्तुळ कापून घ्या. त्यावर स्केचपेनने ३६० अंशांच्या रेषा काढा. एक रबरी चेंडू घ्या. त्याच्या मध्यातून आरपार जाईल अशी एक लोखंडी तार खुपसा. तारेच्या दोन्ही बाजूंना एक एक मणी ओवून घ्या. मण्यांभोवती तार गुंडाळून वेटोळी तयार करा. एका बाजूच्या वेटोळ्याला नायलॉनची दोरी पक्की बांधा. जास्तीत जास्त उंच असलेल्या ठिकाणी छताला एक आकडा ठोकून बसवा. तेथे नायलॉनच्या दोरीचे दुसरे टोक असे बांधा की चेंडू जमिनीपासून ३-४ सेंटीमीटर उंचावार टागलेला राहील. हा झाला आपला लंबक. तो ज्या बिंदूशी स्थिर राहील त्याच्या खाली मध्यबिंदू धरून ३६० अंशाच्या रेषा काढलेला कागद ठेवा. लंबक ओढून हलकेच सोडा. लंबकाची आंदोलने सुरू होतील. ती कोणत्या अंशाच्या प्रतलात फिरत आहेत ते पहा. हळुहळू प्रतलाची अंशात्मक दिशा बदलल्याचे आढळेल.
पृथ्वीच्या परिवलनामुळे लंबकाच्या आंदोलनाच्या प्रतलात एका दिवसात ३६० अंशांचा फरक पडतो.

115.                   घरगुती थर्मॉस.

साहित्य – प्लॅस्टिकची उभी बाटली, पाते, सरबताची धातूची बाटली, थर्मोकोलचे छोटे गोळे. पारदर्शक चिकटपट्टी, फेविकॉल, चकचकतीत कागद.
कृती – एक धातूची सरबताची बाटली घ्या. या बाटलीपेक्षा थोडी मोठ्या आकाराची मोठ्या तोंडाची प्लॅस्टिकची बाटली घ्या. प्लॅस्टिक बाटलीचे झाकण काढा. या बाटलीला तोंडाच्या समोरासमोरच्या बाजूंना सुमारे तीन सेंटीमीटर उंचीच्या चिरा द्या. त्या फाकवून धातूची बाटली आत बसवा. या दोन बाटल्यांच्या मधल्या भागात थर्मोकोलचे छोटे गोळे भरा. अधून मधून थोडे थोडे फेविकॉल टाकत रहा. दोन बाटल्यांमधली पोकळी जास्तीत जास्त गच्च भरा. त्यानंतर बाहेरच्या बाटलीला सर्व बाजूंनी चिकटपट्टी गुंडाळा. त्याच्यावर चकचकीत कागद गुंडाळा. त्यावर पुन्हा चिकटपट्टी गुंडाळा. हा झाला थर्मॉस तयार.
प्लॅस्टिक, थर्मोकोल आणि फेविकॉल यांचा थर उष्णतेचे वहन जलद करत नाही. त्यामुळे आतल्या धातूच्या बाटलीतील पदार्थाचे तापमान बराच काळ स्थिर राहाते.
114.                   विजेच्या दिव्याचा स्पिरीटचा दिवा.

साहित्य – टाकावू विजेचा दिवा, कापड, जाडा खिळा, वात, स्पिरीट, चिकटपट्टीचे रीळ.
कृती – एक टाकावू विजेचा दिवा घ्या. त्याच्या काचेच्या भोवती एक फडके गुंडाळा. त्याच्या वरच्या भागात जाड खिळ्याने हळुहळू ठोका. दिव्याच्या वरच्या भागातला लाखेसारखा थर काढून टाका. त्यानंतर त्याच्या खालचा काचेच्या गोळ्याचा भाग हलकेच थोडासा फोडा. या भागातून वात आत घाला. त्यानंतर स्पिरीट भरा. वात खाली सरकत असेल तर लाखेचे तुकडे दिव्याच्या तोंडाशी वातीभोवती ठेवून वात दिव्याबाहेर राहील असे पहा. दिवा स्थिर ठेवण्यासाठी - संपलेल्या चिकटपट्टी रीळ वापरता येईल. दिवा पेटवून विविध छोट्या वस्तू गरम करण्यासाठी वापरता येईल.
113.                   दाणाबत्ती.

साहित्य – चिखलाचे गोळे, लांबट दाणे किंवा तेलबिया, काड्यापेटी.
कृती – चिखलाचे छोटे छोटे गोळे करा. त्यात लांबट दाणे किंवा तेलबिया उभ्या खोचा. खराब झालेले दाणे किंवा करंज्यासारख्या अखाद्य तेलबिया वापरता येतील. गोळे पक्के वाळू द्या. या झाल्या दाण्याच्या बत्त्या तयार. जेव्हा गरज पडेल तेव्हा दाण्याच्या वरच्या टोकाला जळती आगकाडी लावा. दाण्याने पेट घेतला की काही मिनिटे आपल्याला उजेड मिळेल.
दाण्यातील तेल अर्धवट जळल्यामुळे त्यातून कर्ब बाहेर पडतो, त्याचे तापमान जास्त असले की त्यातून प्रकाश बाहेर पडतो.
112.                   क्रेयॉन्सची बत्ती.

साहित्य – क्रेयॉन्स, ताटली, काड्यापेटी.
कृती – क्रेयॉन्स म्हणजेच तेली खडू  किंवा मेणाचे खडू. ते बनवताना मेण वितळवून त्यात रंग घालतात, त्यांना खडूचा आकार देतात आणि भोवताली कागद गुंडाळतात. आपल्याला उजेड पाडण्यासाठी त्याचा उपयोग करता येईल. काड्यापेटी पेटवून तेली खडूचे टोक तापवा. त्यातले थोडे मेण वितळून ताटलीत पडू द्या. त्यात तेली खडू बसवून पेटला की काही मिनिटे आपल्याला उजेड मिळेल.
मेण अर्धवट जळल्यामुळे त्यातून कर्ब बाहेर पडतो, त्याचे तापमान जास्त असले की त्यातून प्रकाश बाहेर पडतो.
111.                   घरगुती बर्नर.

साहित्य –  सरबताचे दोन रिकामे कॅन, खिळा, कात्री, लोखंडाच्या किसाची घासणी, स्पिरीट काड्यापेटी.
कृती – पेप्सी, कोका कोला सरबताचे दोन रिकामे कॅन घ्या. प्रत्येक कॅनवर तळापासून साधारण तीन सेंटीमीटर इतक्या उंचीवर खिळ्याच्या टोकाने घेरावर एक चरा ओढा. कात्रीच्या सहाय्याने तो भाग कापून घ्या. या दोनपैकी एका भागात घासणी म्हणून वापरला जाणारा लोखंडाच्या बारीक किसाचा एक तुकडा बसवा. त्याच्यावर दुसर्‍या कॅनचा कापलेला तुकडा उलटा बसवा. दाबून किंवा हलके ठोकून पक्का करा. वरच्या तुकड्याच्या खोलगट भागावर मध्यभागी पाच भोके पाडा. तसेच या खोलगट भागाच्या वरच्या बाजूच्या वर्तुळाकार कडेच्या बाहेरच्या बाजूला अंतराअंतरावर आठ भोके पाडा. खोलगट भागात ओतून स्पिरीट या बनवलेल्या दिव्यात जाऊ द्या. बर्नर वापरायचा असेल तेव्हा काड्यापेटी पेटवून खोलगट भागी तापवा, ज्योत पेटली की बर्नर वापरायला तयार

110.                   मध्यान्हीची सावली.

साहित्य – रीळ, पाते, कागद, विटा, काच.
कृती – एक पुठ्ठ्याचे मोठ्या आकाराचे दंडगोलाकार रीळ घ्या. पात्याच्या सहाय्याने त्याच्या एका टोकाला आडव्यात पातळ काप द्या. बांगडीसारखे वर्तुळ तयार होईल. भर दुपारी उन्हाची एक जागा निवडा. जागेवर एक कोरा कागद  ठेवा. त्याच्या चार टोकांवर विटा ठेवा. विटांवर एक काच ठेवा. काचेच्या मध्यभागी रीळ उभे ठेवा. रिळाच्या बरोबर वरतून कागदाकडे पहा. कापलेले वर्तुळ कागदावर असे ठेवा की ते रिळाखाली बरोबर झाकले जाईल. दर ५ मिनिटांनी रिळाची सावली पहा. ती वर्तुळाच्या पुढे-मागे किंवा डावी-उजवीकडे असेल. एके दिवशी ती बरोबर वर्तुळावर आणि वर्तुळाएवढीच असेल.
त्या दिवसाला – झिरो शॅडो डे – शून्य सावलीचा दिवस म्हणतात. याच दिवशी मध्यान्ही सूर्य बरोबर डोक्यावर येतो.

109.                   तेलाचा पसारा. 
Displaying
साहित्य – परात, पाणी, कोळशाची भुकटी, तेल, काच, स्केचपेन, आलेखाचा कागद.
कृती – एका परातीत पाणी घ्या. ते संथ होऊ द्या. त्याच्या पृष्ठभागावर हलके हलके कोळशाची बारीक भुकटी पसरा. त्यावर एक थेंब तेल टाका. तेलाच्या तवंगामुळे कोळशाची भुकटी कडेला ढकलली गेलेली दिसेल. परातीवर एक काच ठेवा. काच न मिळाल्यास जाड प्लॅस्टिकचे पॅड घ्या. स्केच पेनच्या सहाय्याने कागदावर तवंगाचा आकार चितारा. कागद परातीवरून काढून आलेखाच्या कागदावर ठेवा. त्यावरून तवंगाचा आकार मोजा. वेगवेगळी तेले वापरून तवंगाच्या आकारात काही फरक पडतो का? करून पहा.
तेलाच्या रेणूंची आणि पाण्याच्या रेणूंची ओढ जितकी जास्त तितका तवंगाचा आकार कमी.

108.                   बोटाने उचला धोंडा. 
Displaying datauri-file.jpeg
साहित्य – धोंडा, मित्रमंडळी
कृती – एक घमेल्याच्या आकाराचा धोंडा घ्या. त्याच्या भोवती सातजण उभे रहा. प्रत्येकाने आपल्या उजव्या हाताचे पहिले बोट धोंड्याच्या कडेला लावायचे. सर्वांनी एका आवाजात एकसाथ घोषणा द्यायची “अमूक तमूक महाराज कीSSS जSSय”. प्रत्येकाच्या एका एका बोटाच्या ताकदीवर धोंडा उचलला जाईल. धोंडा खाली पडताना पायावर पडणार नाही याची काळजी घ्या. 
धोंड्यावर एकाच पातळीवरून आणि घोषणेमुळे एकाच वेळी लागलेल्या जोरामुळे त्यात टॉर्क निर्माण होऊन धोंडा उचलला जातो.

107.                   शिसपेन्सिलीच्या रेघेची तार. 

साहित्य – कागद, शिसपेन्सिल, सेल, वीजवाहक तारा, एल ई डी दिवा.
कृती – एक सेल, एल ई डी दिवा आणि वीजवाहक तारा घेऊन एक वीजमंडल तयार करा. वीजमंडल जोडल्यावर दिवा लागतो याची खात्री करा. एक कागद घ्या. कागदावर शिसपेन्सिलिने अखंड रेघ ओढा. वीजमंडलातील सेल आणि दिवा यांना जोडणारी तार काढून तिचे एक टोक शिसपेन्सिलीच्या रेघेवर टेकवा. दुसरा वीजवाहक तारेचा तुकडा दिव्याला जोडून त्याचे दुसरे टोक शिसपेन्सिलीच्या रेघेच्या दुसर्‍या टोकाला लावा. दिवा उजळेल.
शिसपेन्सिलीतले शिस ग्रॅफाईटचे असते. ग्रॅफाईट वीजवाहक आहे.

106.                   कठीणपणा तपासा.
साहित्य – प्लॅस्टिकची उभी बाटली, बॉल बेअरिंगचे गोळे, खडू, खडी, साखर, मीठ इ., लोहचुंबक, प्लॅस्टिकची चाळणी.
कृती – एक प्लॅस्टिकची उभी बाटली घ्या. सर्वाप्रथम त्यात अर्धी बाटली भरून खडूचे तुकडे टाका. त्याच्यावर सायकलमध्ये वापरतात ते बॉल बेअरिंगचे शंभर गोळे घाला. बाटलीचे बूच बंद करा. बाटली हलवत शंभर वेळा उलटी सुलटी करा, शंभर वेळा गोल गोल फिरवा. बाटलीचे बूच काढून बाटलीतील सर्व जिन्नस चाळणीत काढून घ्या. लोहचुंबकाने गोळे बाजूला काढून घ्या. चाळणी हलवा. चाळणीतून पूड पडेल. ती बाजूला ठेवा. अशाच प्रकारे साखर, मीठ इत्यादीतून मिळणारी पूड पहा. पदार्थ जेवढा कठीण तेवढी त्याची पूड कमी होते.

105.                   भिजवलेल्या कडधान्याचे वजन. 

साहित्य – वाडगा, मूग, पाणी, झाकण, तराजू.
कृती – अर्धा लिटर पाणी मावेल एवढा एक वाडगा घ्या. त्यात १०० ग्रॅम मूग घाला. त्याच्यावर सुमारे ४०० ग्रॅम पाणी घाला. हा वाडगा झाकून ठेवा. बारा तासानंतर उघडा. जास्तीत जास्त पाणी निथळून काढून घ्या. भिजवलेल्या कडधान्याचे वजन करा. त्यात किती पट वाढ झाली ते पहा. मटकी, मसूर, तूर, उडीद, पावटा, वाटाणा, चवळी, हुलगा, हरबरा अशासारखे अन्य कोणतेही कडधान्य घेऊन हा प्रयोग करून पहा. वजन सुमारे सव्वादोन ते अडीच पट वाढेल.
कडधान्य आसपासच्या वातावरणातून पाणी शोषून घेते त्यामुळे त्याची रुजण्याची क्रिया सुरू होते.

104.                   मुंग्यांचा आवडता रंग कोणता?
साहित्य – पातेले, पाणी, साखर, रंगीत गोळ्या, ड्रॉपर.
कृती – एक छोट्या पातेल्यात एक वाटीभर पाणी घ्या. त्यात एक चमचा साखर घालून ढवळा. साखर पूर्ण विरघळली की अजून थोडी साखर घाला. ढवळून विरघळवा. खूप ढवळली तरी साखर विरघळत नाही अशी वेळ येईपर्यंत ही कृती करा. याला साखरेचे संपृक्त द्रावण म्हणतात. जेम्सच्या गोळ्यांसारख्या गोळ्या या प्रयोगासाठी वापरा. एकेका रंगाची एकेक गोळी घ्या. त्या वर्तुळाच्या आकारात मांडा. गोळ्यांमध्ये पुरेसे अंतर ठेवा. प्रत्येक गोळीवर ड्रॉपरने थेंब थेंब साखरपाणी घाला. गोळीचा रंग साखरपाण्याला आला की हळूच एकेक गोळी काढून घ्या. थोड्या वेळाने तेथे मुंग्या येतील तेव्हा त्यांच्या आवडीचा रंग तुम्हाला कळेल.

103.                   एकाची ताकद अनेकांची ताकद! 
साहित्य – ड्रॉईंग बोर्डाच्या पिना, फुगे.
कृती – काही फुगे घ्या. पूर्णपणे फुगवा. आता एक ड्रॉईंग बोर्डाची पिन घ्या. ती टोक वर करून ठेवा. तिच्यावर एक फुगवलेला फुगा ठेवा. तो हलके दाबा. तो फुटेल. आता या पिनेच्या शेजारी आणखी चार पिना ठेवा. त्यावर एक फुगवलेला फुगा ठेवून हलके दाबा. तो फुटण्यासाठी जास्त दाब द्यावा लागला का? अशा प्रकारे आणखी आणखी पिना ठेवत हा प्रयोग करून पहा. जेवढ्या पिना जास्ती तेवढा फुगा फुटायला जास्त दाब द्यावा लागतो का हे तपासा.
अनेक टोकदार पिना असल्या की फुग्यावर लावलेला दाब विखरला जातो. फुगा फुटण्यासाठी त्या ठिकाणी पुरेसा दाब पडला तरच फुगा फुटतो.

102.                   स्ट्रॉवरून उडवायचे रॉकेट.
साहित्य – स्ट्रॉ, रंगीत कागद, कात्री, गोंद.
कृती – एक चांगली कडक स्ट्रॉ घ्या. स्ट्रॉच्या लांबीइतक्या लांबीचा रंगीत कागद घ्या. स्ट्रॉचे एक टोक थोडे बाहेर राहील अशा बेताने स्ट्रॉभोवती कागदाचे तीन वेढे गुंडाळून घ्या. उरलेल्या कागद कापून घ्या. वेढ्याच्या लांबीला गोंद लावून ती नळी चिकटवून घ्या. तसेच तिचे एक टोक निमुळते करून त्यालाही गोंद लावून ते बंद करा. सुमारे ३ सेंटीमीटर आकाराचे त्रिकोण कापून घ्या. ते मध्यावर घडी घालून कागदी नळीच्या उघड्या बाजूच्या बाहेर उभ्यात गोंदाने चिकटवा. वाळले की झाले रॉकेट तयार. ते स्ट्रॉवर घालून स्ट्रॉत तोंडाने हवा फुंका, रॉकेट उडवा .
स्ट्रॉमधून फुंकलेली हवा कागदी नळीत कोंडली जातो तिचा दाब पुरेसा वाढला की रॉकेटची नळी फेकली जाते.

101.                   पावावर बुरशी.
साहित्य – पाव, पाणी, ब्रश, चमचा, मीठ, साखर, सोडा, प्लॅस्टिकच्या पिशव्या.
कृती – तळहाताच्या आकाराएवढे एका पावाचे चार तुकडे घ्या. ब्रश पाण्यात भिजवून प्रत्येक तुकड्यावर पाण्याचा समान लेप द्या. एका तुकड्यावर एक चमचा साखर, दुसर्‍यावर एक चमचा मीठ, तिसर्‍यावर एक चमचा सोडा घालून पसरवा. चौथा तुकडा तसाच ठेवा. प्लॅस्टिकच्या वितभर आकाराच्या चार चांगल्या पिशव्या घ्या. एकेका पिशवीत पावाचा एकेक तुकडा घालून ठेवा. या पिशव्या सुरक्षित राहतील अशा जागी ठेवा. २४ तासांनी निरीक्षण करा. कोणत्या पावाच्या तुकड्यावर किती बुरशी आली आहे पहा.  

साखर, मीठ, सोडा हे पदार्थ अन्न टिकवण्यासाठी वापरले जातात. बुरशीच्या प्रमाणावरून त्या पदार्थांच्या बुरशीरोधक गुणांचे परिक्षा करता येईल. 

100.                   डासांसाठी पिंजरा.
साहित्य – मोठी प्लॅस्टिकची बाटली, पाते, चिकटपट्टी, गरम पाणी, चमचा, गूळ, यीस्ट, काळा कागद.
कृती – एक प्लॅस्टिकची मोठी बाटली घ्या. ती तळापासून निम्म्याहून २ सेंटीमीटर इतक्या अंतरावर पात्याने आडवी कापा. बाटलीचा वरचा अर्धा भाग उलटा करून खालच्या अर्ध्या भागात दाबून बसवा. त्याची वर्तुळाकार कड चिकटपट्टीने बंद करा. बाटलीत १ सेंटीमीटरपेक्षा थोडी अधिक पातळी भरेल इतके गरम पाणी घाला. त्यात गुळाची पूड २ चमचे भरून घाला. नंतर अर्धा चमचाभर यीस्ट घाला. बाटलीला कडेने काळा कागद लावा. अशी बाटली घरातल्या अंधार्‍या कोपर्‍यात ठेवा. त्यात डास कैद होऊन पडतील.
यीस्ट आणि गूळ यांच्या जैवरासायनिक क्रियेने हळुहळू कर्ब वायू तयार होतो. त्याच्या वासाने डास आकर्षित होतात. बाटलीत जातात. पुन्हा वर येऊ लागले की चिकटपट्टीने चिकटवलेल्या जागेत अडकून राहातात.

99.                   झुरळांसाठी पिंजरा.
साहित्य – पसरट खोके, पाते, चिकटपट्टी, गूळ.
कृती – एक पसरट खोके घ्या. त्याचे झाकण काढून घ्या. झाकणाच्या रुंदीच्या बाजूच्या दोन्ही कडा काढून घ्या. त्याच्यावर निम्म्या उंचीखाली त्रिकोणाच्या आकाराचे काप काढून घ्या. याचप्रमाणे पसरट खोक्याच्या रुंदीच्या बाजूच्या कडांवरही निम्म्या उंचीखाली त्रिकोणाच्या आकाराचे काप काढून घ्या. या कडा कडेला चिरी पाडून थोड्या तिरप्या करत आत ढकला. चिकटपट्टीने पक्क्या करा. आधी कापलेल्या झाकणाच्या कडा या वाकवलेल्या कडांच्या पासून चार बोटे अंतरावर आतल्या बाजूला तिरप्या ठेवत चिकटपट्टीने पक्क्या बसवा. रात्री भिंतीच्या कडेशी थोडा गूळ ठेवा. तिरप्या पट्ट्या लावलेले खोके घ्या. ते गुळ मध्यभागी येईल असे पालथे घाला. रात्रीत त्यात झुरळे आत जाऊन अडकतील.
गूळाच्या वासाने झुरळ आकर्षित होते. तिरप्या त्रिकोणी भागाच्या आत ते जाऊ शकते पण बाहेर पडू शकत नाही. तेथे आपल्या पद्धतीने झुरळांची विल्हेवाट लावता येईल.

98.                   ढेकणांसाठी पिंजरा.
साहित्य – लाकडी ठोकळे, खिळा.
कृती – काही लाकडी ठोकळे घ्या. प्रत्येक लाकडी ठोकळ्यावर खिळ्याने बारीक बारीक खाचा करा. ढेकूण असलेल्या भागात रात्री – गादीखाली, उशीखाली हे ठोकळे कडेला ठेवून द्या. त्या खाच्यांच्या आत जाऊन ढेकूण बसतील. ढेकणांनी भरलेले हे ठोकळे चटचटलेल्या उन्हात ठेवून ढेकणांची विल्हेवाट लावता येईल.
फटीत जाऊन बसणे ढेकणांना फार आवडते. ते अतिशय उन्हात किंवा चटचटलेल्या भागात तग धरू शकत नाहीत.

97.                   पावसाळी किड्यांसाठी पिंजरा.
साहित्य – कागद, दोरा, तेल, दिवा.
कृती – एक कागद घ्या. त्याला एका कोपर्‍यात भोक पाडून त्यातून एक दोरा ओवा. कागदाला तेल लावा. सूर्य मावळताना एका दिव्याजवळ कागद टांगून ठेवा. अंधार झाल्यावर केवळ तोच दिवा पेटता ठेवा. पावसाळी किडे त्याच्याकडे आकर्षित होतील आणि कागदाला चिकटून बसतील. त्यांचे निरिक्षण करा. विल्हेवाट लावा.
कागदावरच्या तेलाच्या वाफेमुळे पावसाळी किड्याचे पंख जड होतात आणि त्यांची ताकद त्यातून उडण्याइतकी नसल्यामुळे ते अडकून पडतात.

96.                   माशांसाठी पिंजरा.
साहित्य – स्टूल, जाळी, तार, गूळ.
कृती – एक स्टूल घ्या. त्याला चारी बाजूंनी घेरून जाळी बांधा. ती जमिनीपासून तीन बोटे वर असली पाहिजे. स्टूलाच्या आतल्या बाजूला बसेल असे तारेचे एक पिरॅमिड बनवा. पिरॅमिडच्या शिखराला टोक आणण्याऐवजी एक छोटा चौरस असू द्या. पिरॅमिडच्या चहूबाजूंनी जाळी बसवा. पिरॅमिड स्टुलाच्या आतल्या भागात व्यवस्थित बसवा. हा झाला माशांसाठी पिंजरा. माशा असलेल्या ठिकाणी थोडा गूळ कागदावर ठेवा. त्याच्यावर पिंजरा ठेवा. माश्या
गुळाकडे आकर्षित होतील आणि थोड्या वेळाने उडून पिंजर्‍यात जातील. त्यांचे निरिक्षण करा. विल्हेवाट लावा.
गुळावर बसलेली माशी थोडा गूळ खाल्ला की तशीच्या तशी वर उडते. पिरॅमिडच्या जाळीचा स्पर्श झाला की तिच्यावर बसते. माशीचा सवय आधाराने वर सरकण्याची असते. त्यामुळे ती पिरॅमिडच्या चौरसाकार तोंडातून स्टुलाच्या पोकळीत जाते. सगळीकडे जाळी असल्याने अडकून पडते.

95.                   रंगीत अंडी.
साहित्य – अंडी, पाणी, रंगीत – फुले, भाज्या व फळे, पातेली, धगीचे साधन
कृती – बीट, पालक, स्ट्रॉबेरी, मायाळूची फळे, रंगीत कोबी, जास्वंद अशासारखी फुले, भाज्या व फळे घ्या. एकेका पातेल्यात त्याचे बारीक तुकडे करून टाका. पातेल्यातले तुकडे बुडतील इतके पाणी घाला. गॅस, स्टोव्ह, शेगडी यासारख्या धगीच्या साधनावर ठेवून प्रत्येक पातेल्यातले पाणी उकळा. त्यातला रंग दाट होऊ द्या. गार झाल्यावर त्यात एक एक अंडे थोडा वेळ बुडवून ठेवा. बाहेर काढून वाळवा. अंड्याचे कवच रंगीत झालेले दिसेल. काही अंडी एकापेक्षा जास्त रंगात बुडवून आणखी वेगवेगळे रंग देता येतील.
फुले, फळे, भाज्यांमध्ये असणारे नैसर्गिक रंग अंड्याच्या कवचावरील बारीक बारीक छिद्रात अडकतात.
94.                   कणकेच्या गोळ्यात विजेचे दिवे.
साहित्य – कणीक, पाणी, परात, चमचा, साखर, मीठ, बॅटरी जोडणी, सेल, विजेच्या तारा, एलईडी दिवे.
कृती –  एका परातीत कणीक घ्या. थोडे थोडे पाणी घालत ती मळून घ्या. कणकेचे दोन भाग करा. एका भागात दोन चमचे साखर घालून नीट मळून घ्या. दुसर्‍या भागात दोन चमचे मीठ घालून मळून घ्या. या प्रत्येकाचे गोळे करा. ओळखू येण्यासाठी मीठाचे गोळे थोडे वेगळ्या आकाराचे करा. आता एक बॅटरी जोडणी घेऊन त्यात चालू सेल घाला. जोडणीच्या दोन टोकांतून दोन तारा काढून त्या मीठ घातलेल्य कणकेच्या दोन तुकड्यांमध्ये खुपसा. या दोन गोळ्यांना जोडत एक एलईडी दिवा खुपसा. दिवा न लागल्यास तो फिरवून घ्या. दिवा पेटेल. दोन पैकी एक तरी गोळा साखरेच्या कणकेचा असेल तर दिवा पेटणार नाही.
साखर विजेची दुर्वाहक आहे तर मीठ सुवाहक आहे. कोणकोणते पदार्थ विजेचे सुवाहक आहेत किंवा दुर्वाहक आहेत ते तपासता येईल.
93.                   बाटलीत फुगणारा फुगा.
साहित्य – प्लॅस्टिकची बाटली, गरम पाणी, वाडगा, गार पाणी. फुगा.
कृती – एका प्लॅस्टिकच्या बाटलीत गरम पाणी भरा. एका वाडग्यात बर्फासारखे गार पाणी भरा. बाटलीतले गरम पाणी ओतून टाका आणि पटकन बाटलीच्या तोंडावर एक रबरी फुगा बसवा. फुग्याचा न फुगलेला भाग बोटाने बाटलीत ढकला. ही बाटली वाडग्यातल्या गार पाण्यात ठेवा. बाटलीतली हवा गार होत जाईल तसतसा फुगा आपोआप फुगत जाईल.
बाटलीतील हवा गार झाली की तिचा दाब कमी होतो. बाहेरील हवेचा दाब जास्त असल्याने ती फुग्यात शिरते आणि त्याला फुगवते.
92.                    रिकाम्या रिफिलित चढते पाणी.
साहित्य – वाडगा, पाणी, रंग, हँगर, वेगवेगळ्या जाडीच्या रिकाम्या रिफिली, पारदर्शक चिकटपट्टी.
कृती – एका वाडग्यात तो अर्धा भरेल इतके पाणी घ्या. त्यात थोडा रंग टाका. वेगवेगळ्या जाडीच्या रिकाम्या रिफिली घ्या. एका हँगर घ्या. पारदर्शक चिकटपट्टीच्या सहाय्याने रिफिली आडव्या हँगरला उभ्या चिकटवा. त्यांचे तळ एकाच पातळीत असले पाहिजेत. हा हँगर वाडग्यावर आडवा ठेवा. रिफिलींचा तळाचा भाग वाडग्यातल्या रंगीत पाण्यात बुडलेला असला पाहिजे. थोड्या वेळाने पहा. रिफिलींमध्ये पाणी चढलेले दिसेल. कमी जाडीच्या रिफिलीत जास्त तर अधिक जाडीच्या रिफिलीत कमी पाणी चढते.
पाण्याचे कण एकमेकांना ओढतात तसेच रिफिलींच्या कणांनाही ओढतात त्यामुळे पाण्याची पातळी कडेला उचलली जाते. कड जवळ असेल तर जास्त उचलली जाते.
91.                   बाटल्यांची शर्यत.
साहित्य – प्लॅस्टिकच्या बाटल्या, पाणी, उतार.
कृती – एक प्लॅस्टिकची बाटली पाण्याने पूर्ण भरून घ्या. तिचे फिरकीचे टोपण फिरवून पक्के बंद करा. दुसर्‍या बाटलीत काहीही न भरता (अर्थात ती हवेने भरलेलीच असेल) तिचे फिरकीचे टोपण फिरवून बंद करा. दोन्ही बाटल्या एका उतारावर आडव्या ठेवा आणि सोडा. बाटल्या घरंगळत खाली जातील. कोणती बाटली आधी खाली पोचते पहा.
भरलेल्या बाटलीत पाणी असल्याने ती एकसंध असते ती पुढे जाते. त्या मानाने रिकामी बाटली कमी वेगाने जाते.

90.       सोन्याचा पाऊस.

साहित्य – पोटॅशियम आयोडाईड. लेड नायट्रेट, पाणी, काचेची भांडी, डाव, चमचा, शेगडी.
कृती – एका काचेच्या भांड्यात दोन डाव पाणी घ्या. त्यात एक ग्रॅम पोटॅशियम आयोडाईड टाका. चमच्याने ढवळून ते विरघळू द्या. दुसर्‍या भांड्यात अशाच प्रकारे लेड नायट्रेटचे द्रावण तयार करा. त्यातील काही थेंब पोटॅशियम आयोडाईडच्या द्रावणात टाका. पिवळ्याधमक रंगाचा साका तयार होईल. आता हेच भांडे काळजीपूर्वक गरम करा. साका पाण्यात विरघळेल. हे द्रावण हळुहळू गार व्हायला लागेल तसतसे सोन्याच्या रंगाचे कण पावसासारखे पडतील.
पिवळ्या रंगाचा पदार्थ लेड आयोडाईड कोमट पाण्यात विरघळतो. त्या द्रावणाचे तापमान हळुहळू कमी केल्यास लेड आयोडाईडचे छोटे, हलके, सोनेरी रंगाचे स्फटिक बनतात.
89.                   लोखंडातून रक्तरंगी धारा.


साहित्य – हैड्रोजन पेरॉक्साईड ३०% द्रावण, पोटॅशियम थायोसायनेट, हैड्रोक्लोरीक आम्ल, पाणी, लोखंडाच्या तारेचे वेटोळे, दोरा, प्लॅस्टिकची बाटली.
कृती – एका प्लॅस्टिकच्या उभ्या बाटलीत अर्ध्याच्यावर पाणी भरा. त्यात थोडे पोटॅशियम थायोसायनेट घालून ते ढवळून विरघळवून घ्या. यातच काही थेंब हैड्रोजन पेरॉक्साईड ३०% चे द्रावण आणि काही थेंब हैड्रोक्लोरीक आम्ल घालून हलके ढवळून एकत्र करा. बाटलीतील द्रावण स्थिर होऊ द्या. एक लोखंडाच्या तारेचे वेटोळे घ्या, त्याला एक दोर्‍याचा तुकडा बांधा. तो तुकडा बाटलीत टांगता राहील असा ठेवा. थोड्या वेळाने त्यातून रक्ताच्या रंगाच्या धारा खाली ओघळताना दिसतील.
हैड्रोजन पेरॉक्साईडमुळे लोखंडाचे ऑक्सिडीकरण होऊन फेरिक आयन तयार होतात. त्याचे थायोसायनेट रक्ताच्या रंगाचे असते.
88.                   शिशाचे गोळे बनवा.

साहित्य – लेड नायट्रेट, कागद, पाणी, काड्यापेटी.
कृती – एक कागदाची उभी पट्टी घ्या. तिच्यावर थोडे पाणी शिंपडा. त्या थेंबांवर लेड नायट्रेट भुरभुरा. कागदावरचे पाणी वाळू द्या. कागद दमट असला पाहिजे. काड्यापेटीतली एक काडी पेटवून ती कागदी पट्टीच्या एका टोकाला लावा. कागद हळुहळू जळत काळा पडत जाईल. लेड नायट्रेट आधी पिवळे पडेल आणि मग त्या डागांमध्येच बारीक बारीक शिशाचे गोळे दिसतील. त्या गोळ्यांच्या वापराने कागदावर काळ्या रेषा ओढता येतात.
कागदातील कार्बन आणि उष्णतेमुळे लेड नायट्रेटचे क्षपण होत शिसे बनते.
87.                   हालवून निळे, थांबल्यावर रंगहीन.

साहित्य – प्लॅस्टिकची पारदर्शक बाटली, पाणी, सोडीयम हैड्रॉक्साईड, ग्लुकोज, मिथिलीन ब्लू.
कृती – एका प्लॅस्टिकच्या पारदर्शक बाटलीत अर्धी बाटली पाणी भरा. त्यात सुमारे दोन ग्रॅम सोडीयम हैड्रॉक्साईड टाकून ते बाटली हलवत विरघळवून घ्या. त्याच्यातच सुमारे दहा ग्रॅम ग्लुकोज टाकून विरघळवा. त्यात दहा थेंब मिथिलिन ब्लू टाका. बाटली वेगाने गोल गोल फिरवा. द्रव निळ्या रंगाचे होईल. बाटली जागीच स्थिर ठेवा. आतला द्रव रंगहीन होईल. पुन्हा हालवल्यावर निळे तर स्थिर केल्यावर रंगहीन होईल.
ग्लुकोजच्या क्षपणामुळे मिथिलिन ब्लू निळे होते तर द्रवात विरघळलेल्या ऑक्सिजनमुळे रंगहीन.
86.                   रसायनांचे उद्यान.

साहित्य – प्लॅस्टिकचा पारदर्शक डबा किंवा पेटी, सोडीयम सिलिकेट, पाणी, डाव, विविध क्षार.
कृती – एका प्लॅस्टिकच्या पारदर्शक डब्यात किंवा पेटी पाऊण पातळीपर्यंत पाणी भरा. यात सुमारे दहा ग्रॅम सोडीयम सिलिकेटची जेली घाला. डावाने ढवळून द्रावण एकजीव करा. धक्का लागणार नाही अशा ठिकाणी ठेवा. त्यात तांबे, लोह, कोबाल्ट, निकेल, शिसे, मँगेनीज यांचे छोटे छोटे स्फटिक टाका. काही तासांनी त्यात छोट्या छोट्या रंगीबेरंगी वृक्षवेली उगवल्यासारखे दिसेल.
धातूंच्या सिलिकेट क्षाराचे स्फटिक रंगीबेरंगी माळांच्या आकारात वाढतात.

85.                   हत्तीची टूथपेस्ट.

साहित्य – तरल साबण किंवा साबणाचे पाणी, पोटॅशियम आयोडाईड, हैड्रोजन पेरॉक्साईड, प्लॅस्टिकची उंच बाटली.
कृती – प्लॅस्टिकच्या उंच बाटलीत थोडा तरल साबण घ्या किंवा साबणाचे पाणी घ्या. त्यात दोन ग्रॅम पोटॅशियम आयोडाईड टाका. थोडा रंग टाकला तरी चालेल. त्यात ३०% संहतीचे ५० मिलीलिटर हैड्रोजन पेरॉक्साईडचे द्रावण टाका. बाटलीच्या तोंडातून फेसाचा लोळ बाहेर येईल जणू काही हत्तीची टूथपेस्टच बाहेर आली आहे.
हैड्रोजन पेरॉक्साइडमुळे पोटॅशियम आयोडाईडचे विघटन होऊन ऑक्सिजन वायू बाहेर पडतो. तरल साबणातून येताना त्याचा फेस होतो, वायूच्या दाबाने बाहेर पडतो.
84.                   तरल जेल तयार करा.
साहित्य – सोडीयम पॉलीअॅक्रिलेट, पाणी, काचेचा पेला.
कृती –सोडीयम पॉलीअॅक्रिलेट रसायनांच्या दुकानात विकत मिळते. तेच मुलांसाठी वापरण्याच्या डायपरमध्ये भरलेले असते. ते वापरता येईल. एका काचेच्या पेल्यात चमचाभर सोडीयम पॉलीअॅक्रिलेट घ्या. काचेच्या पेल्यात पाणी ओता. पहा सोडीयम पॉलीअॅक्रिलेट तरल जेलच्या रुपात फुगून वर येईल.
सोडीयम पॉलीअॅक्रिलेट जलशोषक पदार्थ आहे, त्यात बरेच पाणी शोषले जाते. तो वाळवून पुन्हा वापरून पहा.
83.                   गुप्त शाईतील संदेश.
साहित्य – सोडीयम बायकार्बोनेट, पाणी, वाटी, ब्रश, कागद, काळी द्राक्षे.
कृती – केकमध्ये वापरतात ती बेकिंग पावडर किंवा खाण्याचा सोडा म्हणजे सोडीयम बायकार्बोनेट घ्या. एका वाटीत थोडा सोडा घ्या. थोडे थोडे पाणी घालून एका वाटीत त्याचे संपृक्त द्रावण तयार करा. ब्रशचा वापर करून या द्रावणाने कागदावर काही तरी लिहा. ते वाळल्यावर लिखाण दिसेनासे होईल. हा गुप्त संदेश वाचण्यासाठी एक काळे द्राक्ष घ्या. त्याचा रस हलके हलके कागदावर पसरा सोड्याने लिहिलेले उठून दिसेल.
सोडियम बायकार्बोनेट, कागद आणि द्राक्षाच्या रसातील टॅनिनमुळे एक पिवळसर रंगाचा पदार्थ तयार होतो तो कागदावर उठून दिसतो.
82.                   गरम बर्फ.
साहित्य – सोडीयम बायकार्बोनेट, व्हिनेगार किंवा शिरका, पातेले, शेगडी, काचेचे भांडे, फ्रिज, ताटली.
कृती – एका पातेल्यात अर्धा लिटर व्हिनेगार किंवा शिरका घ्या. त्यात थोडा थोडा खाण्याचा सोडा घालत ढवळत रहा. दर वेळी कार्बन डायॉक्साईड वायूचा फेस येत राहील. असे करत करत फेस येणे थांबले की पातेल्यातला द्राव शेगडीवर आटायला ठेवा. त्यात कणी यायला लागली की पातेले खाली उतरवा. पुन्हा ढवळून कणी विरघळू द्या. द्रव काचेच्या भांड्यात भरून फ्रिजमध्ये ठेवा. तीन तासांनंतर ते भांडे फ्रिजमधून बाहेर काढा. हलक्या हाताने द्व एका ताटलीत बारीक धारेत ओता. ताटलीत बर्फ झालेला दिसेल, तसेच त्याच्या आसपासचा भाग गरम होईल.
फ्रिजमधून काढलेला द्राव अतिशित झालेला असतो, त्याला ओतताना बसलेल्या धक्क्यामुळे त्याचे बर्फासारखे स्फटिक होतात आणि उष्णता बाहेर पडते.
81.                   दुधाचा गोंद.
साहित्य – दूध, व्हिनेगार किंवा शिरका, फडके, खाण्याचा सोडा (सोडीयम बायकार्बोनेट), पातेले.
कृती – थोडे गरम दूध घेऊन त्यात चमचाभर व्हिनेगार घाला. दूध नासेल. न नासल्यास पुन्हा तापवून आणखी व्हिनेगार घाला. आपोआप फाटलेले दूधसुद्धा चालेल. ते फडक्यातून गाळून घ्या. पाणी टाकून द्या. फडक्यातील चोथा दाबून दाबून त्यातले पाणी काढून टाका. पूर्ण पाणी निघाले की त्यात थोडा थोडा खाण्याचा सोडा घालून मिश्रण एकजीव करा. आवश्यक तर थोडेसे कोमट पाणी घालून आपल्याला हवा तितका पातळ गोंद बनवा.
फाटलेल्या दूधातील रसायने नासण्याच्या क्रियेने चिकट होतात. हा गोंद जास्त दिवस टिकण्यासाठी फ्रिजमध्ये ठेवावा. वाईट वास आला तर वापरू नये.

80.                   गंजायला किती हवा हवी?.
साहित्य – लोखंडाचा किस, काचेची बाटली, पाणी, परात.
कृती – एक मोठ्या तोंडाची काचेची बाटली घ्या. बाटलीच्या तळाशी सुमारे एक सेंटिमीटर जाडीचा लोखंडाच्या किसाचा पुंजका बसवा. बाटलीत पाणी भरा. एक परात घ्या परातीत बाटलीतले पाणी ओता. त्या पाण्यात बाटली उपडी ठेवा. परातीतल्या पाण्याची पातळी सुमारे दोन सेंटीमीटर असू द्या. ही सर्व रचना धक्का लागणार नाही अशा ठिकाणी ठेवा. बाटलीत पाणी चढलेले दिसेल.
लोखंडाचा किस बाटलीतल्या हवेतील ऑक्सिजनच्या वापरामुळे गंजायला लागेल. तसतसा तेथील हवेचा दाब कमी होईल आणि बाटलीतील पाण्याची पातळी वाढेल. ती जास्तीत जास्त किती वाढेल? हवेतल्या ऑक्सिजनच्या प्रमाणाएवढी! 
79.                   वक्रता बदलणारा आरसा.
साहित्य – रंगाची रिकामी बादली, पाते, भेटवस्तू गुंडाळायचा कागद, गोंद, खिळा, पिचकारी.
कृती – एक रंगाची रिकामी बादली घ्या. तिच्या झाकणाचा पातळ भाग पात्याने गोलाकार कापून घ्या. त्या गोलाकारापेक्षा थोड्या मोठ्या आकारात भेटवस्तू गुंडाळायचा कागद कापून घ्या आणि गोंद लावून आतल्या बाजूने पक्का चिकटवून घ्या. कागदाची चंदेरी बाजू बाहेर आली पाहिजे. बादलीच्या तळाला खिळ्याने भोक पाडून त्यात एक पिचकारी पक्की बसवा. बादलीचे झाकण फिरवून घट्ट बसवा. झाकणात सपाट आरशासारखे प्रतिबिंब दिसेल. पिचकारीने हवा भरा. आरसा बहिर्वक्र होईल. पिचकारीने हवा काढून घ्या आरसा अंतर्वक्र होईल.
बाहेरच्या आणि आतल्या हवेच्या दाबातील फरकामुळे चकचकीत कागदावर ताण पडून त्याला एकसमान वक्रता येते.
78.                   मोबाईलचा आवाज घुमवा.
साहित्य – मोबाईल, काचेचा निमुळता पेला.
कृती – मोबाईलच्या उंचीपेक्षा थोड्या कमी उंचीचा एक काचेचा निमुळता पेला घ्या.  मोबाईलवर गाणी, रेडीओ किंवा रिंगटोन चालू करा. तो आवाज विशेषत: त्यातून येणार्‍या आवाजाचा घुमारा लक्षपूर्वक ऐका. मोबाईल निमुळत्या काचेच्या पेल्यात ठेवा. आवाजाचा घुमारा वाढून सर्व स्वर सुरेल ऐकू येतील.
काचेच्या पेल्याच्या निमुळतेपणामुळे आवाजातल्या अनेक स्वरांना सुसंवादी घुमारा यायला कुठे ना कुठे जागा मिळते, त्यामुळे प्रत्येक स्वर सुरेल होतो.
77.                   काळवंडणारे चक्र.
साहित्य – साखर, पाणी, वाटी, चमचा, ब्रश, कागद, बहिर्गोल भिंग, ऊन.
कृती – वाटीत पाणी घ्या. त्यात थोडी थोडी साखर घालून चमच्याने ढवळत साखरेचा संपृक्त द्राव तयार करा. त्या द्रावात ब्रश बुडवून घ्या. त्या ब्रशने एका कोर्‍या कागदावर मध्यभागापासून सुरू होणारी भुईचक्रासारखी आकृती काढा. ती पूर्ण वाळून कागद कडक होऊ द्या. बहिर्गोल भिंग घेऊन कागदाच्या मध्यभागी ऊन केंद्रित करा. चक्राकार आकृती एकदा जळायला लागली की भिंग काढले तरी काळवंडत जळत जाईल.
साखरपाण्याने रंगवून वाळवलेल्या भागाचा ज्वलनांक कागदाच्या इतर भागाच्या ज्वलनांकापेक्षा कमी झालेला असल्यामुळे तेवढाच भाग चटकन पेटत जातो.
76.                   आतला फुगा फोडा.

साहित्य – दोन फुगे, रबर बँड, बहिर्गोल भिंग, ऊन.
कृती – दोन रंगांचे दोन फुगे घ्या. एक फुगा दुसर्‍याच्या आत सरकवा. आतला फुगा फुगवा. रबर बँडने बांधून घ्या. बाहेरचा फुगा आणखी मोठा फुगवा. दोन्ही मिळून रबर बँडने बांधून घ्या. ऊन्हात जा. आतल्या फुग्यावर बहिर्गोल भिंगाने सूर्यकिरण केंद्रित करा. त्याजागी भोक पडून आतला फुगा फुटेल पण बाहेरचा तसाच राहील.
किरण केद्रित झालेल्या ज्या ठिकाणी जास्त ऊर्जा एकत्रित होते, त्या ठिकाणी फुग्याचे रबर तापून जळले की फुगा फुटतो.

75.                   काकवीचा चिकटपणा मोजा – प्रकार 5
साहित्य – काकवी, पाणी, करवंटी, खिळा, स्टॉपवॉच असलेला मोबाईल, फडके.
कृती – एक छोट्या नारळाची करवंटी घ्या. तिच्या सर्वात तळाशी खिळ्याने छिद्र करा. छिद्रावर बोट ठेवून करवंटीत पाणी भरा. स्टॉपवॉच चालू करत छिद्राखालील बोट बाजूला करा. करवंटीतील पाणी पूर्णपणे पडण्यास लागणारा कालावधी मोजा, नोंदवा. करवंटी फडक्याने कोरडी करा. आता हीच कृती काकवी वापरून करा. काकवी पूर्णपणे पडण्यास लागणारा कालावधी मोजा, नोंदवा.
काकवी पूर्णपणे गळून जाण्यास लागणारा कालावधी पाणी पूर्णपणे गळून जाण्यास लागणार्‍या कालावधीच्या जितके पट तितके पट काकवी चिकट.

74.                   काकवीचा चिकटपणा मोजा – प्रकार 4
साहित्य – काकवी, पाणी, उंच बाटली, बेअरींगचे बॉल, स्टॉपवॉच असलेला मोबाईल.
कृती – एका काचेची किंवा प्लॅस्टिकची उंच बाटली घ्या. ती पाण्याने पूर्ण भरा. सायकलच्या चाकात वापरले जाणारे बेअरींगचे १० बॉल एका हातात घ्या. हात बाटलीच्या तोंडाशी ठेवा. स्टॉपवॉच चालू करत दहातला एक बॉल बाटलीतल्या पाण्यात सोडा. एक तळाला लागला की दुसरा असे करत दहाही बॉल तळाशी पोचायला लागणारा कालावधी मोजा, नोंदवा. हीच कृती काकवी वापरून करा. दहा बॉल काकवीत पूर्णपणे पडण्यास लागणारा कालावधी मोजा, नोंदवा.
काकवीत दहाही बॉल तळाशी पोचायला लागणारा कालावधी पाण्यात दहाही बॉल तळाशी पोचायला लागणार्‍या कालावधीच्या जितके पट तितके पट काकवी चिकट.

73.                   काकवीचा चिकटपणा मोजा – प्रकार 3
साहित्य – काकवी, पाणी, काचेची पट्टी, मोजपट्टी, दोन एकसारखे ड्रॉपर.
कृती – एका काचेची लांबट पट्टी घ्या. ती स्वच्छ आणि कोरडी करून घ्या. एका ड्रॉपरने पट्टीच्या लांबीच्या टोकाशी एक थेंब पाणी टाका. दुसर्‍या ड्रॉपरने त्याच्या शेजारी एक थेंब काकवी टाका. थेंब टाकलेली बाजू थोडी उचला. थेंब घरंगळायला लागतील. पाण्याचा थेंब घरंगळत पट्टीच्या दुसर्‍या टोकाशी पोचला की पट्टी पुन्हा आडवी ठेवा. प्रत्येक थेंबाने किती अंतर पार केले मोजा, नोदवा. काकवीच्या थेंबाने पार केलेल्या अंतराने पाण्याच्या थेंबाने पार केलेल्या अंतराला भागा.
भागाकार जितके पट तितके पट काकवी चिकट.

72.                   काकवीचा चिकटपणा मोजा – प्रकार 2
साहित्य – काकवी, पाणी, मोजपट्टी, दोन एकसारखे ड्रॉपर.
कृती – कंपासपेटी मधील मोजपट्टी घ्या. ती भिंतीला किंवा टेबलवर उभी राहील अशी ठेवा. पट्टीसमोर एका हाताची चिमूट धरून उभे रहा. चिमटीचा अंगठा पट्टीच्या एखाद्या खुणेला समांतर राखा. उदा. ३ सें.मी. चिमूट उघडून अंगठ्यावर ड्रॉपरने एक थेंब पाणी टाका. चिमूट हलकेपणाने बंद करून हलकेपणाने उघडण्याचा प्रयत्न करा. चिमटीतले पाणी अखंड राहून चिमूट किती उघडली जाते ते मोजा, नोंदवा. हीच कृती काकवीचा थेंब वापरून करा. चिमटीतली काकवी अखंड राहून चिमूट किती उघडली जाते ते मोजा, नोंदवा.
काकवीच्या चिमटीची लांबी पाण्याच्या चिमटीच्या जितके पट तितके पट काकवी चिकट.

71.                   काकवीचा चिकटपणा मोजा – प्रकार 1.
साहित्य – काकवी, पाणी, स्वेटर विणायची सुई, मार्कर, फडके, स्टॉपवॉच असलेला मोबाईल.
कृती – एका स्वेटर विणायची सुई घ्या. तिच्या टोकापासून दहा सेंटीमीटर अंतरावर मार्करने एक खूण करा. ही सुई खुणेपर्यंत पाण्यात बुडवून पटकन पाण्याच्या पातळीच्या बाहेर काढा. स्टॉपवॉच सुरू करा. सुईच्या पृष्ठभागावरील सर्व पाणी पडून जायला लागणारा कालावधी मोजा, नोंदवा. सुई फडक्याने स्वच्छ पुसून घ्या. हीच कृती काकवी वापरून करा. सुईच्या पृष्ठभागावरील सर्व काकवी पडून जायला लागणारा कालावधी मोजा, नोंदवा.
काकवी पडून जाण्यास लागणारा कालावधी पाणी पडून जाण्यास लागणार्‍या कालावधीच्या जितके पट तितके पट काकवी चिकट.

70.                   पानामागे दडलंय काय ?
साहित्य – झाडाची पाने, मोठ्या तोंडाच्या बाटल्या.
कृती – वीतभर उंचीची मोठ्या तोंडाची बाटली घ्या. तुमच्या आसपास असणारी झाडे न्याहाळा. ज्या झाडांची पाने दोन सेंटामीटरपेक्षा लांब आहेत त्याची तपासणी करा. पान न मोडता वाकवून पानाच्या खालच्या बाजूला पहा. ज्या पानाखाली पुंजक्यात घातलेली अंडी दिसतील अशी एक दोन पाने तोडून घ्या. बाटलीत उभी ठेवा. झाकण लावा. काही काळाने अंड्यातून अळ्या बाहेर आलेल्या दिसतील. त्यावेळी त्याच प्रकारची आणखी एक-दोन पाने बाटलीत भरा. झाकण लावण. रोज निरीक्षण करा. अळ्या वाढतील, कोश करतील, कोशाचे रंग बदलतील, किडे बाहेर येतील.
विशिष्ठ झाडावर विशिष्ठ कीडे आढळतील.

69.                   तुरटीची लाही.
साहित्य – तुरटी, लांब दांडीचा चमचा, रुमाल, धगीचे साधन, काड्यापे.
कृती – एक लांब दांडीचा चमचा घ्या. दांडीच्या टोकाला रुमाल गुंडाळा. चमच्याच्या खोलगट आकाराच्या पावपट लहान आकाराचा तुरटीचा तुकडा घ्या. तो चमच्याच्या मध्याभागी ठेवा. चूल, स्टोव्ह, गॅस पैकी कोणतेही एक साधन पेटवा. त्याच्या धगीवर चमच्यातला तुरटीचा खडा तापवा. तो फुगून त्याची लाही होते.
तुरटीच्या स्फटिकात पाणी असते. तापवल्यावर त्याची वाफ जोराने बाहेर फेकली जाते. तुरटीच्या तुकड्याचा आकार वाढतो – यालाच तुरटीची लाही म्हणतात.
  
68.                   जलशोषक पदार्थ.
साहित्य – तूर डाळ, मीठ, रवा, पोहे, पाणी, फडके.
कृती – आपले हात स्वच्छ धुवून फडक्याला पुसून कोरडे करून घ्या. एक मूठ तूर डाळीने भरून घ्या. मुठीच्या अंगठ्याजवळच्या पोकळीतून मुठीत एकदोनदा फुंकर मारा. मूठ सरळ करून उघडा. तूर डाळीचे दाणे दमट होवून एकेकमेकांना चिकटलेले दिसतील. तूर डाळ जलशोषक आहे. त्याचप्रमाणे मीठ, रवा, पोहे इ. घेऊन प्रयोग करून पहा.
काही पदार्थ बाष्प शोषून दमट होतात. कॅल्शियम क्लोराईड, मॅग्नेशियम क्लोराईड, सिलिका जेल इत्यादी पदार्थ कापडाच्या छोट्या पिशव्यात भरून औषधे कोरडी राखतात.

67.                   हैड्रोजन वायू.
साहित्य – बाटली, पाणी, ड्रेनेक्स, फुगे, दोरी.
कृती – एक उभी लहान तोंडाची बाटली घ्या. बाटलीत एक तृतीयांश उंचीपर्यंत पाणी भरा. बाटलीच्या तोंडावर बरोबर बसेल असा एक फुगा घ्या. कात्रीने ड्रेनेक्सची पुडीच्या कोपर्‍याला काप द्या. ड्रेनेक्सच्या पूडीतून सुमारे दोन ग्रॅम पूड बाटलीतल्या पाण्यात टाका. बाटलीच्या तोंडावर फुगा अडकवा. फुगा फुगला की दोरीने बांधून घ्या. हा फुगा हवेत तरंगतो.
ड्रेनेक्समध्ये दाहक सोडा आणि अॅल्युमिनियमचा चुरा असतो. त्याच्या क्रियेने हैड्रोजन वायू तयार होतो. ड्रेनेक्स काळजीपूर्वक हाताळा.

66.                   उष्णतेने प्रसरण की आकुंचन?
साहित्य – अॅल्युमिनियम फॉईल, उदबत्ती, काड्यापेटी.
कृती – एका बाजूने अॅल्युमिनियम आणि दुसर्‍या बाजूने कागद असलेली फॉईल घ्या. बिस्किटाचे पुडे तसेच सिगारेटची पाकीटे यांमध्ये असा कागद असतो. या कागदाच्या १ सेंमी रुंद आणि ५ सेंमी लांब पट्ट्या तयार करा. एक पट्टी चकचकीत भाग बाहेर ठेवून उभ्यात दुमडा. दुसरी पट्टी चकचकीत भाग आत ठेवून उभ्यात दुमडा. दोन्ही पट्ट्या कोनाच्या आकारात टेबलवर ठेवा. एक उदबत्ती पेटवून घ्या. पेटत्या टोकाने पट्ट्यांच्या कोनाकाराच्या मध्यभागी धग द्या.
दोन्ही पट्ट्या विरूद्ध प्रकारात वळतात. अॅल्युमिनियम कागदापेक्षा जास्त उष्णता शोषून अधिक प्रसरण पावतो. त्यामुळे पट्ट्यांचा आकार वक्र आणि विरूद्ध दिशांना होतो.   


65.                   पाण्याची उकळी थांबवा.
साहित्य – छोटे पातेले, पाणी, शेगडी, साखर, चमचा.
कृती – एक छोटे पातेले घ्या. ते पाण्याने अर्धे भरा. शेगडी पेटवून त्यावर पातेले ठेवा. पातेल्यातल्या पाण्याला खळखळ उकळी फुटू द्या. उकळत्या पाण्यात दोन चमचे साखर पटकन टाका. उकळी थांबते. पुन्हा उकळी फुटली की दोन चमचे साखर पटकन टाका. उकळी थांबते. असे किती वेळा करता येते ते करून पहा. नोंदवा.

एखादा पदार्थ पाण्यात विरघळला की पाण्याचा उत्कलनांक वाढतो. त्यामुळे आहे त्या तापमानाला उकळी थांबल्याचे दिसते. हाच प्रयोग मीठ घेऊन करून पहा.
64.                   पाण्याची उकळी वाढवा.
साहित्य – छोटे पातेले, पाणी, शेगडी, चहापत्ती, चमचा.
कृती – एक छोटे पातेले घ्या. ते पाण्याने अर्धे भरा. शेगडी पेटवून त्यावर पातेले ठेवा. पातेल्यातल्या पाण्याला खळखळ उकळी फुटू द्या. उकळत्या पाण्यात एक चमचा चहापत्ती टाका. पाण्याची उकळी वाढते. ती कमी झाली की पुन्हा एक चमचा चहापत्ती टाका. उकळी वाढते.

चहापत्तीतील काही घटक गरम पाण्यात विरघळणारे आहेत त्यांच्यामुळे पाण्यात रंग उतरतो. 
चहापत्तीत चोथा भरपूर असतो. त्यात हवा अडकून बसलेली असते, ती उष्णतेने बाहेर येते. 
तसेच चहापत्तीला टोके असतात. टोकांमुळे बुडबुडे बनण्याला वाव मिळतो. 
उकळी जास्त फुटलेली दिसते. हाच प्रयोग भुस्सा वापरून करून पहा.

63.                   उकळीला चमच्याची मदत.
साहित्य – छोटे पातेले, पाणी, शेगडी, लांब दांडीचा चमचा.
कृती – एक छोटे पातेले घ्या. त्याच्या आतल्या भागात कोठेही पोचा आलेला नको, पातेले करपलेले नको, घाण अडकलेले नको. त्यात पाऊण पातेले पाणी भरा. शेगडीवर उकळायला ठेवा. उकळी फुटल्यावर धग कमी करा. उकळीचे बुडबुडे कमी झाले की एक लांब दांडीचा चमचा घेऊन तो पाण्याच्या बुडाशी टेकवून तळाला खरवडा. खरवडलेल्या जागी पाणी उकळते.

एखादा द्रव उत्कलनांकाइतका तापला तरी बुडबुडा तयार होण्यासाठी टोकदार जागा लागते.

62.                   कोमट पाणी लागेल उकळायला.
साहित्य – सिरींज किंवा पिचकारी, पातेले, पाणी, शेगडी.
कृती – एका पातेल्यात पाणी घ्या. शेगडीवर गरम करा. पाणी उकळू देऊ नका. इंजेक्शनची सिरींज किंवा पिचकारी घ्या. सिरींजची सुई काढून बाजूला ठेवा. सिरींज किंवा पिचकारीचे टोक गरम पाण्यात ठेवून दट्ट्या मागे ओढा. थोडे पाणी आत जाऊ द्या. सिरींज किंवा पिचकारी पाण्याच्या बाहेर काढा. टोकावर बोट ठेवून दट्ट्या मागे ओढा. आतले पाणी कोमट असतानाच उकळलेले दिसेल.

दट्ट्या मागे ओढताना आतल्या कोमट पाण्यावरचा दाब कमी होतो. दाब कमी की उत्कलनांक कमी होतो म्हणून कोमट पाणीही उकळते.

61.                   न तापवताच बुडबुडे.
साहित्य – छोटे पातेले, पाणी, लांब दांडीचा चमचा, झाकण.
कृती – एक पातेले घ्या. नळाच्या पाण्याने पूर्ण भरा. पाण्यात एक लांब दांडीचा चमचा ठेवा. धक्का लागणार नाही अशा ठिकाणी हे सारे झाकून ठेवा. काही तासाभराने उघडून पहा. पातेल्याच्या कडेला तसेच चमच्यावर बुडबुडे आलेले दिसतील.

नळाचे पाणी क्लोरीन वायूने शुद्ध केलेले असते. पाण्यात विरघळलेला वायू टोकाची जागा मिळताच बुडबुड्याच्या स्वरूपात बाहेर पडतो.
60.                   कोणता तळपाय मोठा ?
साहित्य – तुम्ही स्वत:मोठ्या आकाराचा कागद, कात्री, टोकदार पेन्सिल
कृती – एक मोठ्या आकाराचा कागद घ्या. त्याच्या एका बाजूला तुमचा डावा पाय पूर्णपणे टेकवा. टोकदार पेन्सिलीने त्या पायाची बाह्यरेषा काढा. बाह्यरेषेने तयार झालेली ही बाह्याकृती कात्रीने कापून घ्या. अशाच प्रकारे उजव्या पायाची बाह्याकृती कापून घ्या. या दोन्ही बाह्याकृती एकमेकांवर ठेवून त्याच्यांत काही फरक पडलेला दिसतो का ते बघा. तुम्हाला दोन तळपायातले अंतर लक्षात येईल.

एक तळपाय दुसर्‍या तळपायापेक्षा मोठा असल्याचे आढळते. अनेकांच्या तळपायांचे बाह्याकार घेऊन तपासा. डावखुर्‍यांचा डावा तळपाय मोठा असतो का ?
59.                   तळपायावरचा भार मोजा.

साहित्य – तुम्ही स्वत:, वजन काटा, परात, पाणी, कुंकू किंवा मऊगाळ चिखल, मोठा आलेखाचा कागद.
कृती – वजन काट्याचा वापर करून तुमचे वजन पहा. ते नोंदवून ठेवा. तळपाय बुडतील एवढे पाणी एका परातीत घ्या. त्यात कुंकू किंवा मऊगाळ चिखल घालून दाट गंध तयार करा. परातीशेजारी एक आलेखाचा मोठा कागद जमिनीवर ठेवा. परातीत एक एक पाय बुडवून त्याचा एक एक ठसा आलेखाच्या कागदावर उमटवा. ठशांचा मिळून आकार किती चौरस सेंटीमीटर आहे ते मोजा. त्या आकाराला तुमच्या वजनाने भाग द्या. त्यावरून तुमच्या तळपायावर किती भार पडतो ते समजेल.
58.                   किड्याची चाल

साहित्य – किडा, छोटी पिशवी, कुंकू, पाणी, छोटी ताटली, पांढरा कागद.
कृती – एक संथ चालणारा किडा शोधा. तो हलकेच एका छोट्या पिशवीत ठेवा. एका छोट्या ताटलीत कुंकू आणि पाणी घालून गंध तयार करा. एक पांढरा कागद सपाट जमिनीवर पसरा. छोट्या पिशवीतून हलक्या हाताने किडा उचलून त्याचे पाय गंधात बुडवा. मग किडा पांढर्‍या कागदाच्या मध्यावर ठेवा. त्याला त्याच्या मर्जीने हलू द्या. किड्याच्या पायांच्या क्रमाचे निरीक्षण करा. दोन पायात पडलेल्या अंतराचे निरीक्षण करा.

किड्याला तीन उजवे आणि तीन डावे पाय असतात. त्यांचा क्रम सांगण्यापेक्षा तपासून पहाण्यात शोध लागल्याचे समाधान मिळेल.
57.                   रंगीत ज्योत.
साहित्य – कागद, मीठ, चुना, बोरीक पावडर, निळी ज्योत.
कृती – हाताने फाडत एका खडबडीत कागदाच्या उभ्या पट्ट्या करा. कागदाच्या कडेला बारीक बारीक तंतू दिसतील अशी पट्टी घ्या. पट्टी मीठात बुडवा. तंतूंमध्ये मीठाचे काही कण उचलले जातील. हे कण एका निळ्या ज्योतीत जाळा. कण पेटतील तशी ज्योत सोनेरी पिवळ्या रंगाची होईल. अशाच प्रकारे चुन्यामुळे ज्योत विटकरी रंगाची होईल तर कॅरमसाठी वापरल्या जाणार्‍या बोरीक पावडरमुळे ज्योत हिरवट होईल.

प्रत्येक मुलद्रव्याची ज्योत वेगळ्या रंगाची असते. सोडीयमची सोनेरी पिवळी, कॅल्शियमची विटकरी, बोरॉनची हिरवट इ.56.                   बर्फाच्या बोटाने उचला तांदूळ.
साहित्य – तुम्ही स्वत:, पेला, पाणी, बर्फ, ताटली, तांदूळ, रुमाल.
कृती – एका ताटलीत तांदूळ पसरून ठेवा. बोटाच्या चिमटीने तांदूळाचा एक एक दाणा उचलून घेण्याचा सराव करा. एका पेल्यात थोडे बर्फाचे तुकडे घाला. पेला पाण्याने भरा. या बर्फाच्या पाण्यात बोटे बुडवून गार होऊ द्या. त्यानंतर हात बाहेर काढून बोटे रुमालाने कोरडी करा. आता बोटांच्या चिमटीने तांदूळाचा एक एक दाणा उचलता येतो का पहा.
बोटे गार पडल्यावर मेंदूचे संदेश त्यांच्यापर्यंत नीट पोचत नाहीत.

55.                   खार्‍या पाण्याचे गोडे पाणी.

साहित्य – खारे पाणी, परात, जड भांडे, प्लॅस्टिकचा कागद, दोरी, काचेची गोटी.
कृती – एक परात घ्या. परातीच्या मध्यभागी परातीपेक्षा कमी उंचीचे एक जड भांडे ठेवा. परातीत खारे पाणी (विहिरीचे मचूळ पाणी किंवा समुद्राचे, खाडीचे पाणी) भरा. आतल्या जड भांड्यापेक्षा पाण्याची पातळी कमी ठेवा. परातीवर दोरीच्या सहाय्याने एक प्लॅस्टिकचा कागद ताणून बांधा. कागदावर एक काचेची गोटी ठेवा. गोटी मध्यभागी जाऊन थांबेल आणि गोटीच्या वजनाने प्लॅस्टिकचा कागद थोडा वक्राकार होईल. हे उपकरण दिवसभर ऊन असेल अशा ठिकाणी ठेवा. पाणी तापेल, त्याची वाफ होईल, प्लॅस्टिकच्या कागदावर पाण्याच्या थेंबाच्या रुपात सांद्रिभूत होईल. कागदाच्या मध्याकडे घरंगळत जाईल. जड भांड्यात शुद्ध पाणी थेंब थेंब पडेल.
पाण्याचीच वाफ होते, त्यातल्या क्षाराची होत नाही.

54.                   सूर्यफुलातल्या बियांची रचना.

साहित्य – सूर्यफूल, खडू.
कृती – एक काढणीला आलेले सूर्यफूल घ्या. त्याच्या वाळलेल्या पाकळ्या हलके काढा. एक खडू हातात घ्या. सर्वात मधली बी शोधून काढा. त्या बीला लागून असलेली बी या दोन्हींचे मध्यबिंदू खडूने जोडा. दुसर्‍या बीला लागून असलेली एक बी अशी शोधून काढा की ती चक्राकार मांडणीत बसेल. अशा पद्धतीने सर्वात कडेच्या बी पर्यंत पोचेल असा चक्राकार कंस काढा. आता दुसरी सर्वात आतली आणि खडूची खूण नसलेली बी शोधा. तिच्यापासून सुरू होणारा आधीच्या कंसाच्या दिशेत वळणारा दुसरा कंस काढा. असे एकाच दिशेने जाणारे सर्व कंस काढा. मग विरुद्ध दिशेने जाणारे कंस काढा.
५५    कंस एका दिशेचे तर ८९ कंस विरूद्ध दिशेचे येतात. या संख्या फिलोनसी मालिकेतल्या सलग संख्या आहेत.

53.                   रम्य गुणोत्तर

साहित्य – एक हात, पट्टी.
कृती – आपल्याला हाताची लांबी मोजायची आहे. कोपरापासून मनगटापर्यंतची लांबी मोजा. नोंदवून ठेवा. (क). कोपरापासून मधल्या बोटापर्यंतची लांबी मोजा. नोदवून ठेवा. (ह). मनगटापासून मधल्या बोटापर्यंतची लांबी मोजा, नोदवून ठेवा. (ब).  ह आणि क यांचे गुणोत्तर काढा. तसेच क आणि ब यांचे गुणोत्तर काढा. दोन्हीचे उत्तर सुमारे १.६१८ येते.
या गुणोत्तराला रम्य गुणोत्तर म्हणतात. एका सरळ रेषेचे दोन असमान भाग गेले की मोठा खंड आणि पूर्ण रेषा यांचे गुणोत्तर, लहान खंड आणि मोठा खंड यांच्या गुणोत्तर इतके असेल तर त्याला गम्य गुणोत्तर म्हणतात. आपला हात रम्य गुणोत्तरात असतो.

52.                   बसल्या बसल्या वीज.

साहित्य – प्लॅस्टिकची खुर्ची, कृत्रीम धाग्याचे कापड, एक व्यक्ती.
कृती – एका व्यक्तिला एका प्लॅस्टिकच्या खुर्चीवर बसवा. एक कृत्रिम धाग्याने बनवलेला – नायलॉन, टेरिलिन, पॉलिइस्टर यांपैकी – कापडाचा मोठा तुकडा घ्या. सदरा, साडी काहीही चालेल. त्या कापडाने खुर्चीवर बसलेल्या व्यक्तीला वारा घाला. कपडा व्यक्तिच्या जवळून नेताना विजेच्या ठिणग्या पडलेल्या दिसतील. हा प्रयोग अंधारात केल्यास ठिणग्या स्पष्ट दिसतील. कधी कधी ठिणग्यांचा झटका बसतो, सावधपणे प्रयेग करा.
कृत्रिम धाग्याच्या कपड्याच्या हालचालीने स्थिरविद्युत निर्माण होते. तिच्या प्रभावाने प्लॅस्टिकमध्ये प्रवर्तीत वीज तयार होते. दोन्ही विरूद्ध भाराच्या वीजा निर्भारीत होताना ठिणग्या पडतात.

51.                   अंगात वीज.

साहित्य – तुम्ही स्वत:
कृती – तुमचा एक हात - डावखोर्‍यांनी उजवा आणि उजखोर्‍यांनी डावा – सरळ जमिनी समांतर ताणा. तो हात कोपर्‍यात दुमडा. दुसर्‍या हाताच्या मधल्या बोटाने कोपर्‍याच्या हाडाच्या टोकावर हलका झटका द्या. तुम्हाला विजेचा झटका बसलेला जाणवेल. यावरून तुमच्या अंगात वीज आहे हे सिद्ध होईल.

हाताच्या कोपर्‍याच्या हाडांजवळील - अलनर नस त्वचेच्या बरीच जवळ असते. नसांचे कार्य विजेच्या सूक्ष्म प्रवाहावर अवलंबून असते. आपल्या शरीरात पेशीत पोटॅशियम जास्त तर रक्तात सोडीयम जास्त असतो. त्यांच्यात विशिष्ट परिस्थितीत वीजभार निर्माण होतो.

50.                   सूर्यावरचे डाग घरात पहा

साहित्य – आरसा, कागद, कात्री, पट्टी, पेन्सिल, कंपास.
कृती – एका ए4 आकाराच्या कागदावर मध्यभागी एक सेंटिमीटर त्रिज्येचे वर्तुळ काढा. वर्तुळ कात्रीच्या सहाय्याने कापून घ्या. तो कागद एका आरशावर चिकटवा. आरसा घराबाहेर उन्हात ठेवा. वर्तुळाकार भोकातून येणारा कवडसा भिंतीवर पडू द्या. आरसा भितीपासून दूर असेल तेवढा कवडसा मोठा पडेल. कवडसा वगळता बाकी येणारे उजेड कमीतकमी करा. कवडशामध्ये काही काळसर ठिपके दिसतील ते सूर्यावरचे डाग आहेत. कवडशात ढगही हालताना दिसतील.
 आरशावरून परावर्तित झालेला सूर्यप्रकाश कमी प्रखर होतो, तो भिंतीवर पडून परावर्तीत होताना त्याची प्रखरता आणखी कमी होते आणि बारकावे दिसायला लागतात.

49.                   संत्र्याची आतषबाजी
साहित्य – मेणबत्ती, काड्यापेटी, संत्री
कृती – संत्र्याची साल सोला. आतल्या फोडी खाऊ शकता. एक मेणबत्ती काड्यापेटीने पेटवा. तिची ज्योत स्थिर राहू द्या. संत्र्याच्या सालीचा एक तुकडा अंगठा आणि मधले बोट यांच्या पकडीत धरा. मेणबत्तीच्या ज्योतीजवळ नेऊन साल उभ्यात दाबा. सालीतून उडालेले शितोंडे प्रखर उजेड पाडत पेटतील.
संत्र्याच्या सालात ज्वालाग्राही तेल असते. दाबल्यावर त्याचे तुषार उडतात. मेणबत्तीच्या ज्योतिमुळे पेटतात व संपून विझतात.
  
48.                   मऊ काजू करा टणक
साहित्य – मऊ पडलेले काजू, बदाम, पिस्ते, फ्रिज
कृती – मऊ पडलेले काजू, बदाम, पिस्ते वगैरे तेलबिया खायला मजा येत नाही. ते पूर्ववत कडक करण्यासाठी मऊ सुकामेवा एका बशीत पसरून ठेवा. ती बशी फ्रिजच्या आत ठेवा. काही तासांनी बशी बाहेर काढून पहा सुकामेवा पुन्हा टणक झालेला असेल.
पाणी आत शिरल्याने सुकामेवा मऊ होतो. फ्रिजमध्ये हवा गार आणि कोरडी असते. कोरड्या हवेमुऴे सुक्यामेव्यातला दमटपणा बाहेर फेकला जातो.

47.                   आम्लतादर्शक पट्टी
साहित्य – साधा वहीचा कागद, सदाफुलीची फुले, कात्री, लिंबू, सोडा.
कृती – साधा – गुळगुळीत नसलेला – वहीचा कागद घ्या. कागदावर शाई फुटत असेल तर तो या प्रयोगासाठी उत्तम कागद. सदाफुलीच्या फुलाच्या पाकळ्या कागदावर चोळून कागद रंगीत करा. कागद ओलसर झाला तरी चालेल. कागद कडक होईपर्यंत वाळवा. यातला एक तुकडा घेऊन त्यावर लिंबाच्या रसाचा थेंब टाका. कोणता रंग येतोअशाच दुसर्‍या तुकड्यावर ओलसर करून सोड्याची चिमूट टाका. कोणता रंग येतो पहा. दोन रंग वेगळे आले की आपली आम्लतादर्शक पट्टी तयार झाली. न झाल्यास आणखी पाकळ्या चोळून कागद वाळवा. कात्रीने कागदाच्या अर्धा सेंटिमीटर रुंदीच्या पट्ट्या करा.
सदाफुलीच्या पाकळीतील रंगद्रव्य आम्लतेनुसार रंग बदलते.

46.                   हैड्रोजन क्लोराईड वायू बनवा.
साहित्य – मीठ, खाण्याचा सोडा, छोटा खलबत्ता, चमचा, आम्लतादर्शक पट्टी, अमोनिया.
कृती – छोट्या खलबत्त्यात एक चमचा कोरडे मीठ घाला, तसेच चमचाभर खाण्याचा सोडा घाला. बत्त्याने हे मिश्रण खलत रहा. आंबूस वास येईल. त्यावेळी ओलसर आम्लतादर्शक पट्टी खलाजवळ आणा तिचा रंग बदलेल. अमोनियाच्या द्रावणाचा एक थेंब चमच्यावर घ्या. तो खलाजवळ आणल्यास त्यातून नवसागराचा पांढरा धूर आलेला दिसेल.
मीठ आणि खाण्याचा सोडा कोरड्यातच खलला की त्यातून हैड्रोजन क्लोराईड वायू मुक्त होतो व खलात धुण्याचा सोडा तयार होतो. अमोनियाच्या द्रावणातून बाहेर पडणारा अमोनिया वायू हैड्रोजन क्लोराईड वायू बरोबर संयोग पावून नवसागर धूर स्वरूपात तयार होतो.

45.                   सात वीत का आठ वीत?

साहित्य – अनेक व्यक्ती, फूटपट्टी, भिंत, पेन्सिल
कृती – एका भिंतीवर पट्टी आणि पेन्सिलीच्या सहाय्याने उंची मोजण्यासाठी उपयोगी पडतील अशा खुणा करा. एका व्यक्तिला तेथे उभे करून तिची उंची मोजा. त्याच व्यक्तिला फूटपट्टीवर हात ठेवून तो ताणयला सांगा. करंगळीच्या टोकापासून ते अंगठ्याच्या टोकापर्यंतचे अंतर मोजा. ते एक वीत झाले. त्यावरून ती व्यक्ती तिच्या किती वीत उंच आहे ते पहा. सात वीत का आठ वीत?
वय वाढते तसे उंची किती वीत हे प्रमाण कसे बदलते ते तपासा.

44.                   मुद्दाम उमलवलेले फूल

साहित्य – दोन कळ्या, तुमची फुंकर
कृती – एकाच झाडाच्या दोन सारख्या आकाराच्या टपोर्‍या न उमललेल्या कळ्या निवडा. त्यापैकी एक कळी खुडून हातात घ्या. झाडावरची कळी निसर्गात वार्‍याच्या मदतीने उमलते तशी तुमच्या हातातली कळी फुंकरीने हळुहळू उमलवा. फुंकरून उमलवलेला कळी आणि निसर्गात उमललेली कळी यांच्या आकारात काही फरक दिसतो का ते पहा. पाकळ्यांच्या रचनेत काही फरक पडतो का ते पहा. फुलाच्या टिकावूपणात काही फरक पडतो का ते पहा.
उमलवलेल्या फुलापेक्षा उमललेलं फूल अधिक मोठं, टवटवीत दिसतं आणि दीर्घ काळ टिकतं.

43.                   आपोआप उमलणारे कागदी फूल

साहित्य - वृत्तपत्राचा कागद, ब्लेड अगर कात्री, नाणे, ताटली, पाणी
कृती – एक वृत्तपत्राचा कागद घ्या. कात्री वापरून तुमच्या पंजाएवढे कागदाचे वर्तुळ कापून घ्या. कागदाच्या मध्यभागी नाणे ठेवा. नाण्यापासून निघणार्‍या समान अंतरावरच्या सहा त्रिज्यांना ब्लेडने काप द्या. नाणे काढून घ्या. या सहा पाकळ्या आत दुमडून कळीचा आकार द्या. एका ताटलीत चार थेंब पाणी घ्या. कळी केलेला कागद त्यावर उभा ठेवा. कागद ओला होत जाईल तसतश्या पाकळ्या उमलताना दिसतील.
कागदाचे वाकवलेले तंतू पाण्यामुळे लांबतात त्यामुळे पाकळी उमलताना दिसते.

42.                   फुग्यात हवा किती?

साहित्य – फुगा, दोरी, पट्टी
कृती – एक गोलाकार फुगा घ्या. तो पूर्ण फुगवा. त्याचे तोंड दोरीने बांधा. उन्हात एका सपाट पृष्ठभागावर फुगा काळजीपूर्वक ठेवा. त्याच्या सावलीच्या परिघाच्या कडेकडेने दोरीचे वर्तुळ पटकन् तयार करा. वर्तुळ पूर्ण झाल्यावर तेवढा दोरा काढून घ्या. दोर्‍याची लांबी मोजा. परिघाच्या लांबीवरून (२ x पाय  x त्रिज्या) गणित करून फुग्याची त्रिज्या मिळवा. त्रिज्येवरून गोलाकार फुग्याचे घनफळ काढा.
(4/3 पाय  X त्रिज्या3.). हेच फुग्यातल्या हवेचे आकारमान.

41.                   भिंतीवर सप्तरंग

साहित्य – पसरट पातेले किंवा परात, पाणी, छोटा आरसा
कृती – घराबाहेर उन्हात एक पसरट पातेले किंवा परात ठेवा. त्याच्या आत एक छोटा आरसा ठेवा. आरशातून परावर्तित झालेल्या उन्हाचा कवडसा घरात भिंतावर पडेल अशा पद्धतीने आरशाची जागा पक्की करा. पसरट पातेल्यात हळुहळू पाणी घालून पातेले पाण्याने पूर्ण भरा. घरात पडलेला कवडसा इंद्रधनुष्यासारखा सप्तरंगी झालेला दिसेल.

सूर्यप्रकाश अनेक रंगछटांचा बनलेला असतो. पाण्यात शिरताना प्रत्येक रंगछटेच्या किरणाची दिशा वेगवेगळ्या प्रमाणात बदलते. आरशावरून परावर्तीत झाल्यानंतर पुन्हा पाण्याबाहेर पडताना प्रत्येक रंगछटेच्या किरणाची दिशा वेगवेगळ्या प्रमाणात  आणखी थोडी बदलते. त्यामुळे रंगछटा अलग झालेल्या दिसतात.

40.                   झाडाची उंची मोजणे प्रकार 5
साहित्य – झाड, मोबाईल, एक व्यक्ती, मोजपट्टी.
कृती – एक व्यक्ती निवडा. तिची उंची मोजा (उ). ज्या झाडाची उंची मोजायची आहे त्याच्याशेजीरी तिला उभे करा. फोटो काढता येणारा मोबाईल घ्या. फोटोच्या चौकटीत ते झाड आणि ती व्यक्ती पूर्ण मावेल असा फोटो घ्या. व्यक्तीची फोटोतली उंची मोजा (फ१). या उंचीने व्यक्तीच्या उंचीला भागून (उ/फ१) येणारी पट (प) काढा. फोटोतील झाडाची उंची मोजा (फ२). या उंचीला पटीने गुणा (फ२ गुणिले प). झाडाची उंची मिळेल.  
फोटोत सर्व वस्तूंच्या प्रतिमा एकाच पटीत बदलतात. 
39.                   झाडाची उंची मोजणे प्रकार 4
साहित्य – १ मीटर लांबीची पट्टी, मोजपट्टी किंवा टेप, झाड.
कृती – हा प्रयोग लख्ख ऊन असेल तेव्हा करावा. सूर्योदयानंतर किंवा सूर्यास्ताच्या आधीच्या लगत केल्यास अधिक अचूक उत्तर मिळेल. १ मीटर लांबाची पट्टी उन्हात झाडाशेजारी उभी ठेवा. पट्टीची सावली मोजा, झाडाची सावली मोजा. झाडाच्या सावलीला पट्टीच्या सावलीने भागा. भागाकाराचे उत्तर म्हणजे झाडाच्या सावलीइतके येईल.
दोन उभ्या वस्तू आणि त्यांच्या सावल्या या दोन एकरूप त्रिकोणांच्या बाजू असल्यामुळे त्यांच्या लांबीचे गुणोत्तर समान असते.
38.                   झाडाची उंची मोजणे प्रकार 3
साहित्य – दोन सारख्या लांबीच्या पट्ट्या, गोंद, झाड.
कृती – हा प्रयोग एका दिवसात विशिष्ठ दोन वेळाच करता येतो. दोन सारख्या लांबीच्या पट्ट्या घ्या. त्या एका टोकाशी एकमेकींना काटकोनात राहातील अशा प्रकारे गोंदाने पक्क्या चिकटवा. ज्या झाडाची उंची मोजायची आहे त्याच्या शेजारी उन्हात हा काटकोनी जोड उभा ठेवा. आडवी पट्टी सूर्याच्या विरूद्ध बाजूला ठेवा. उभ्या पट्टीच्या टोकाची सावली आडव्या पट्टीच्या टोकावर पडली की झाडाच्या सावलीची लांबी मोजा. ती झाडाच्या उंची एवढीच असते.
सूर्य ४५ अंशावर आला की समद्‍विभूज काटकोन बनतो, त्यात उभी बाजू आडव्या बाजूइतकी असते.
37.                   झाडाची उंची मोजणे प्रकार 2
साहित्य – झाड, गॅसचा भरलेला फुगा, लांब दोरा, स्केच पेन, मोजपट्टी.
कृती – हा प्रयोग वारा पडलेला असेल तेव्हा करता येतो. एक गॅसचा भरलेला फुगा घ्या. त्याच्या टोकाला भरपूर लांबी असलेला दोरा जोडा. झाडाखाली उभे राहून गॅसचा फुगा हळुहळू उभा सोडा. तो झाडाच्या शेंड्यापर्यंत पोचू द्या. फुग्याला जोडलेल्या उभ्या दोर्‍याचा जो भाग जमिनीला टेकला असेल त्यावर स्केच पेनने खूण करा. फुगा हळुहळू खाली घ्या. त्या खुणेपासून फुग्याच्या शेंड्यापर्यंतचे अंतर पट्टीने मोजा. ते झाडाच्या उंचीएवढे असते.
गॅसचा फुगा हवेच्या उद्धरणशक्तीमुळे वारा नसेल तर सरळ वर जातो.

36.                   झाडाची उंची मोजणे प्रकार 1

साहित्य – एक छोटी काठी, विजेरी किंवा टॉर्च, दोरी, कोनमापक, मोजपट्टी, टॅन कोष्टक.
कृती – हा प्रयोग अंधारात करावा. एका काठीच्या टोकाला दोराच्या सहाय्याने एक विजेरी किंवा टॉर्च पक्का बांधा. झाडापासून दहा मीटर अंतरावर एक खूण करा. या खुणेवर विजेरी बांधलेल्या काठीचे दुसरे टोक ठेवा. विजेरीचा झोत झाडाच्या शेंड्यावर पडेल अशा प्रकारे काठी तिरपी ठेवा. काठीने जमिनीशी केलेला कोन मोजा. त्या कोनाच्या टॅनची किंमत टॅन कोष्टकात पहा. या किंमताला दहाने गुणल्यावर झाडाची उंची समजेल.
एखाद्या कोनाची टॅन म्हणजे काटकोन त्रिकोणातील त्या कोनासमोरची बाजू (येथे झाडाची उंची) भागिले लगतची बाजू (येथे झाडापासूनचे अंतर, १० मीटर) यांचे गुणोत्तर. 
35.   दोन डोळे किती शेजारी?

साहित्य – प्लॅस्टिकची पट्टी, स्केचपेन, चिकटपट्टी.
कृती – या प्रयोगासाठी एक मदतनीस लागेल. एक चांगली पारदर्शक प्लॅस्टिकची पट्टी घ्या. तिचा मध्यभाग मदतनीस व्यक्तिच्या नाकावर ठेवा. एक चिकटपट्टीच्या कपाळ आणि प्लॅस्टिकपट्टी यांना मिळून चिकटवा. त्या व्यक्तिला स्थिर बसायला तसेच लांबवर बघायला सांगा. नजर हलता कामा नये. एक स्केच पेन घेऊन त्या व्यक्तिच्या डोळ्याच्या बाहुल्या पट्टीतून दिसतील तेथे स्केचपेनने ठिपके द्या. दोन ठिपक्यांमधले अंतर मोजा.
दूर अंतरावर बघत असताना दोन डोळ्यांमध्ये सुमारे सहा सेंटीमीटर अंतर असते.

34.   तहानलेला कावळा.
साहित्य – तांब्या, पाणी, गोट्या किंवा खडे.
कृती – तहानलेला कावळा ही गोष्ट प्रयोग करून तपासायची आहे. एका तांब्यात तळाशी गोष्टीतल्या इतके पाणी घ्या. त्यात एक गोटी किंवा कावळ्याच्या चोचीत मावेल इतक्या आकाराचा खडा टाका. पाण्याची पातळी थोडी वाढेल. असे एक एक करत आणखी खडे किंवा गोट्या टाका. पाण्याची पातळी पूर्ण वर येण्यासाठी लागणार्‍या गोट्या किंवा खड्यांची संख्या, खेपा, वेळ यांची आकडेवारी तपासून पहा. तहानलेला कावळा ही गोष्ट सिद्ध होण्यासाठी आधीची पाण्याची पातळी किती असावी तेही तपासा.
दगडावर दगड टाकले की दगडांमध्ये किती तरी मोकळी जागा राहाते त्यात पाणी भरल्याशिवाय ते वर येऊ शकत नाही.
    33. खडू फुंकरा बाटलीत.

साहित्य – लहान तोंडाची बाटली, खडूचा तुकडा.
कृती – एक लहान तोंडाची बाटली घ्या. टेबलवार आडवी ठेवा. बाटलीच्या तोंडापेक्षा लहान आकाराचा खडूचा तुकडा घ्या. तो बाटलीच्या तोंडात ठेवा. फुंकर मारून तो तुकडा बाटलीत ढकलायचा आहे. विविध प्रकारे फुंकर मारून खडूचा तुकडा बाटलीत ढकलायचा प्रयत्न करा. कितीतरी प्रयत्न केले तरी तुकडा बाहेर फेकला जातो.
फुंकर मारताना बाटलीत कोंडल्या गेलेल्या हवेचा दाब वाढतो आणि ती जोराने बाहेर येते, येताना खडूचा तुकडा बाहेर ढकलते.

32.   मध्याकडेच जाणार.

साहित्य – पाणी, पाण्याचा मग, वाटी, प्लॅस्टिकचे झाकण
कृती – एका मगमध्ये पाणी भरून घ्या. छोट्या प्लॅस्टिकच्या बाटलीचे झाकण घ्या. ते उलटे धरून हलकेच मगमधल्या पाण्याच्या मध्यभागी ठेवा. झाकण कडेकडे सरकते. आता एका वाटीत पाणी घेऊन मगमध्ये थोडे थोडे टाका. पाण्याची पातळी मगच्या कडेच्या वर जाईल तसे कडेला गेलेले झाकण मध्याकडे सरकताना दिसेल.

मगच्या पातळीच्या वर असलेल्या पाण्यातील कणांची ओढ त्यांना एकमेकांजवळ आणते, त्याबरोबर झाकणही मध्याकडे ढकलले जाते. 

31. ऐकण्याचा नकाशा काढा.
साहित्य – एक व्यक्ती, फोन, मोबाईल, कापूस, रुमाल, कागद, पेन.
कृती – एका व्यक्तिला एका खोलीत फोन शेजारी बसवा. एक मोबाईल घेऊन फोनवरून तो डायल करायला सांगा. तो आवाज लक्षात ठेवायला सांगा. बसलेल्या व्यक्तीच्या एका कानात कापसाचा बोळा बसवा तसेच रुमाल बांधून तिचे डोळे झाका. एका कागदावर खोलीचा नकाशा काढा. नकाशात व्यक्तीचे स्थान दाखवा. मोबाईलला रिंग केल्यावर जिथून आवाज येतो तिकडे बोटाने दाखवायला सांगा. व्यक्तीने दाखवलेल्या दिशेला रेघ ओढा टोकाला (१) अंक लिहा तसेच प्रत्यक्ष मोबाईलच्या जागी नकाशात (1) लिहा. असे वेगवेगळ्या ठिकाणी ठेवून करा. प्रत्यक्ष जागा आणि दाखवलेली जागा यातला फरक पहा. दुसरा कान बंद करून हाच प्रयोग करा. ऐकण्याचा नकाशा मिळेल.

आपल्याला नेमकी दिशा लक्षात येण्यासाठी दोन्ही कानांमध्ये ऐकू येणार्‍या आवाजात फरक असतो.

30. भिंगरीवरचे रंग.
साहित्य – भिंगरी, वेगवेगळ्या रंगांचे कागद, कात्री, गोंद.
कृती –एक भिंगरी घ्या. भिंगरीच्या आकारात मावतील अशा वर्तुळाकारात प्रत्येक रंगाचा कागद कापून घ्या, प्रत्येक वर्तुळाकार कागदाच्या समान सहा पाकळ्या करा. सहा रंगांच्या प्रत्येकी एक अशा सहा पाकळ्या भिंगरीच्या वरच्या बाजूला गोंदाने डकवा. भिंगरी वेगात फिरवा. सहा रंगांची मिळून दिसणारी रंगछटा पहा.

अनेक रंगांच्या एकत्रिकरणाने मिळणारी रंगछटा सहात नसलेल्या छटेच्या पूरक रंगाची असते.

29. गूळ नाही साखर नाही पाणी मात्र गोड.
साहित्य – पाणी, तुरट आवळा, पेला.
कृती – एका पेल्यात पाणी घ्या. एक घोट पाणी प्या. पाण्याची चव लक्षात ठेवा. पाण्यात गूळ, साखर किंवा अन्य कोणताही गोड पदार्थ घालू नका. तुरट आवळ्याचा एक तुकडा चावून चावून खा. आता एक घोट पाणी तोंडात घ्या. पाणी गोड लागेल.

आवळ्याच्या तुरट चवीमुळे जीभेवरच्या चव ग्रंथी काही प्रमाणात बधीर होतात. त्या वेळी पाण्यांच्या रेणूंचा स्पर्श झाला की मेंदूत त्याचा अर्थ गोड असा लावला जातो.

28. स्वेटर गरम करतो गार राखतो.
साहित्य – तुम्ही, स्वेटर, बर्फ, घड्याळ.
कृती – एक स्वेटर घ्या. अंगात घाला. घड्याळात वेळ बघा. तुमच्या शरीराला हळुहळू उबदार वाटू लागेल. काही वेळाने घाम आल्याचे जाणवेल. पुन्हा घड्याळात बघा. किती वेळ लागला त्याची नोंद घ्या. स्वेटर अंगातून काढा. बर्फाचा एक घट्ट गोळा करून घ्या. बर्फाला स्वेटर घाला. तुम्हाला घाम फुटायला लागला तितका वेळ तो ठेवा. मग स्वेटर काढा. गरम होऊन बर्फ वितळला का तपासा.
स्वेटर उष्णतारोधक पदार्थाचा बनवलेला असतो. उष्णतेचे वहन होण्यात त्याचा अडथळा येतो.

27. कडेकडेच जाणार.
साहित्य – पाणी, पाण्याचा मग, प्लॅस्टिकचे झाकण
कृती – एका मगमध्ये पाणी भरून घ्या. छोट्या प्लॅस्टिकच्या बाटलीचे झाकण घ्या. ते उलटे धरून हलकेच मगमधल्या पाण्याच्या मध्यभागी ठेवा. झाकण कडेकडे सरकते. कितीही वेळा करून खात्री करून घ्या. पाण्याच्या मग ऐवजी त्यापेक्षा मोठ्या तोंडाचे भांडे घेऊन काय फरक पडतो, ते पहा.

पाण्याच्या कणांमध्ये एकमेकांशी असलेल्या ओढीच्या जोरापेक्षा पाण्याच्या कणांना मगच्या कणांशी ओढीचा जोर जास्त असतो. त्यामुळे पाण्याच्या पृष्ठभागाची ओढ झाकणाला कडेकडे ढकलते.

26. मिठातून उजेड .
साहित्य – जाड मीठ, पाणी, काचेचा पेला.
कृती – हा प्रयोग पूर्ण अंधारात करायला हवा. एक काचेचा पेला घ्या. त्यात पाणी भरा. हातात मीठाचे खडे घ्या. पूर्ण अंधार करा. मिठाचा एक खडा पाण्यात टाका. खडा विरघळत जाईल तसतसा अतिशय मंद हिरवट उजेड पडलेला दिसेल.
निसर्गत: मिठाचे स्फटिक बनत असताना त्यात कुठे कुठे आयनांची रचना अपुरी राहीलेली असते. मीठ विरघळताना तेथे अडकलेले मुक्त आयन पाण्याच्या संपर्कात येतात. आयनांची रासायनिक क्रिया होते त्यावेळी उजेड रुपात ऊर्जा बाहेर पडते.

25. काळवंडणारा रंग.

साहित्य – रंगीत छपाई असलेला कागद, विविध रंगांचे जिलेटीनचे कागद..
कृती – एक रंगीत छपाई असलेला कागद घ्या. त्यातल्या वेगवेगळ्या रंगांच्या छटा नीट बघून घ्या. कोणत्या तरी एका रंगाचा जिलेटीनच्या कागदाचा तुकडा घ्या. तो तुमच्या डोळ्यांसमोर धरा. रंगीत छपाई असलेल्या कागदावरचे रंग बघा. कोणता रंग काळा किंवा गडद करडा दिसतो ते बघा. तो रंग आणि जिलेटीनचा रंग यांना पूरक रंग म्हणतात
हिरवी शाई लाल रंग शोषून घेते आणि बाकी सगळे रंग परावर्तित करते त्याचा परिणाम म्हणून तो भाग हिरवा दिसतो. लाल जिलेटीन हिरवा प्रकाश शोषून घेतो त्यामुळे हिरवा भाग अप्रकाशित किंवा काळा दिसतो.

24. एका कानाने ध्वनीवेध.
साहित्य – फोन, मोबाईल, कापूस, रुमाल.
कृती – एका व्यक्तिला एका खोलीत फोन शेजारी बसवा. एक मोबाईल घेऊन फोनवरून तो डायल करायला सांगा. तो आवाज लक्षात ठेवायला सांगा. बसलेल्या व्यक्तीच्या एका कानात कापसाचा बोळा बसवा तसेच रुमाल बांधून तिचे डोळे झाका. मोबाईलला रिंग केल्यावर जिथून आवाज येतो तिकडे बोटाने दाखवायला सांगा. असे मोबाईल वेगवेगळ्या ठिकाणी ठेवून करा. एका कानाने ऐकून नेमकी दिशा सांगायला कठीण जाते.
आपल्या दोन्ही कानांमध्ये ऐकू येणार्‍या आवाजात फरक पडतो त्यामुळे आपल्याला नेमकी दिशा लक्षात येते.

23. गरम फुंकर गार फुंकर.
साहित्य – स्वत:.
कृती – एका हाताची मागची बाजू तोंडासमोर न्या. गाल फुगवा. ओठात छोटीशी फट ठेवून हातावर फुंकर मारा. फुंकरीमुळे गार वाटते. आता ओठाची फट थोडी मोठी करून फुंकर मारा. फुंकरीचा गारवा कमी होईल. तोंड जास्तीत जास्त उघडे ठेवून हाss असा आवाज करत फुंकर मारा. ही गरम फुंकर.
फुंकर मारताना तोंडातली जास्त दाबाची हवा वेगाने बाहेर येताना थंड होते. तोंड पूर्ण उघडून मारलेल्या फुंकरीचे तापमान शरीराच्या आतल्या भागाइतके असते.

  22. गरम फुंकर बसवते झाकण पक्के.
साहित्य – स्टीलचा पेला, प्लॅस्टिकचे झाकण.
कृती – एक स्टीलचा पेला घ्या. पेल्याच्या तोंडापेक्षा मोठ्या आकाराचे प्लॅस्टिकचे हलके झाकण घ्या. डाव्या हातात पेला उलटा धरा. त्याच्या तोंडाखाली झाकण ठेवून ते उजव्या हाताच्या मधल्या बोटाने हलके दाबा. बोट काढा. झाकण खाली पडते. आता पेल्यात गरम फुंकर पटकन पेला उलटा धरा. त्याच्या तोंडाखाली झाकण ठेवून ते उजव्या हाताच्या मधल्या बोटाने हलके दाबा. बोट काढा. झाकण पेल्याला चिकटून राहाते.
गरम फुंकरीमुळे पेल्यातील हवा विरळ होते, झाकण लावून गार झाल्यावर तिचा दाब कमी होतो. बाहेरच्या हवेच्या दाबामुळे झाकण पक्के बसते.

21. रूपयाभर पाणी

साहित्य – एक रूपयाचे नाणे, पेलाभर पाणी, ड्रॉपर
कृती – एक रूपयाचे नाणे सपाट पृष्ठभागावर ठेवा. शाई भरण्याच्या स्वच्छ ड्रॉपरमध्ये पाणी भरा. त्यातून एक थेंब पाणी नाण्याच्या मध्यावर टाका. त्याच्यावर आणखी थेंब पाणी टाका. नाण्यावरून न सांडता किती थेंब पाणी नाण्यावर साचेल याचा अंदाज करा. बहुधा तुमच्या अंदाजापेक्षा किती तरी अधिक पाणी नाण्यावर सामावेल.
पाण्याच्या थेंबामध्ये परस्परांना जोडून घेण्याचा जोर असतो, तो गुरुत्त्वाकर्षणापेक्षा कमी झाला की पाणी ओसंडून वाहते. 
   20. एकापेक्षा दोन हलके?
साहित्य – दोन सारख्या आकाराच्या उभट डब्या – झाकणासह, वाळू, एक व्यक्ती
कृती – पूर्वतयारी - दोन डब्या घ्या. एका डबीत जास्तीत जास्त वाळू भरा. झाकण लावा. आता प्रयोगाला सुरूवात करा. एका व्यक्तीला तळहात पुढे करून उभे करा. त्या तळहातावर भरलेली डबी ठेवा. हातावर पडलेला भार अनुभवायला सांगा. दुसरी डबी पहिल्या डबीवर ठेवा. समोरच्या व्यक्तिला दोन्ही डब्या एकमेकींवर ठेवल्यावर भार कमी जाणवतो.
दुसरी डबी ठेवली जात असताना तळहाताचे स्नायू दुप्पट भार सहन करण्याची तयारी करतात पण भार फार वाढत नाही त्यामुळे तो कमी झाल्यासारखा वाटतो.


19. वस्तूला दूध पाजा.
साहित्य – विविध प्रकारच्या वस्तू, दूध, चमचा, लाकडी फळी, फडके.
कृती – एक लाकडी फळी घ्या. फळीवर स्वच्छ फडके नीट पसरा. फडक्यावर एक वस्तू स्थर राहील अशी ठेवा. एका चमच्यात चमचाभर दूध घ्या. चमच्याची कड वस्तूच्या पृष्ठभागाला टेकवा. चमचा किंचित तिरपा करा. चमच्यातले दूध हळुहळू कमी होताना दिसेल. दुधाचा पातळ थर वस्तूवरून सरकताना दिसला नाही तरी फडके दूधाने ओले झालेले दिसेल.
दूधाच्या पृष्ठभागावरून थोडेसे दूध वस्तूच्या पृष्ठभागावर आले की त्यातल्या पाण्याच्या कणांच्या ओढीने चमच्यातील दूध ओढले जाते.

18. कोणता डोळा लाडका?
साहित्य – ३० मीटर पलिकडची वस्तू, तुम्ही स्वत:
कृती – एका मोकळ्या जागेसमोर उभे रहा. ३० मीटर पलिकडची एक वस्तू निवडा. दोन्ही डोळे उघडे ठेवून त्या वस्तूकडे बोट दाखवा. स्थिर रहा. आधी डावा डोळा बंद करून बघा. तो उघडा. मग उजवा डोळा बंद करून बघा. कोणत्या डोळ्याने बघताना बोट आणि वस्तू एका रेषेत दिसते? तो तुमचा लाडका डोळा.
प्रत्येक व्यक्तिची एक बाजू दुसरीपेक्षा सक्षम असते. काही डावखोरे असतात काही उजखोरे. तसेच डोळ्याच्या बाबतीत होते.

17. चष्मेवाल्यांना जग कसे दिसते?
साहित्य – बहिर्गोल भिग, चष्मा.
कृती – दार खिडक्यांच्या विरूद्ध बाजूला असलेल्या भिंतीवरची अंधारी जागा निवडा. एक बहिर्गोल भिंग त्या जागेसमोर उभे धरा. ते पुढे मागे करत भिंतीवर समोरच्या दार खिडकीची स्पष्ट प्रतिमा मिळवा. ती उलटी दिसेल. आता भिंगाच्या पुढे चष्म्यातले एक भिंग धरा. प्रतिमा धूसर होईल. दोन्ही भिंगात तेवढेच अंतर राखत दोन्ही भिंगे पुढेमागे करत भिंतीवर स्पष्ट प्रतिमा मिळवा. आता फक्त चष्मा काढून घ्या. भिंतीवर पडलेली धूसर प्रतिमा दिसते तसे जग त्या चष्मेवाल्याला दिसते.
डोळ्याच्या भिंगाने प्रतिमा धूसर दिसते म्हणून चष्म्याचा आधार घ्यावा लागतो.

16. गव्हांकुराची वाढ.
साहित्य – चौकोनी ट्रे, माती, पाणी, रांगोळी, गहू, गव्हाची चाळणी.
कृती – साधी माती गव्हाच्या चाळणीने चाळून घ्या. ट्रे मध्ये तिचा थर एक-दिड सेंटीमीटर व्हायला पाहीजे. मातीवर पाणी शिंपडा. रांगोळीने दर २ सेंटीमीटर अंतरावर अधिकची खूण करा. त्यांनी बनवलेल्या कोपर्‍यातल्या चौरसात दोन गहू पेरा. पुढे दर ४ तासांनी एकेका चौरसात दोन गहू पेरा, थोडे पाणीही शिंपडा. शेवटच्या चौरसात पेरलेल्या गव्हाला मोड आल्यावर प्रत्येक गव्हांकुराची उंची मोजा.
ती वेळेनुसार वाढली आहे का?

15. साखरेतून उजेड .
साहित्य – जाड साखर, फरशी, बत्ता
कृती – हा प्रयोग पूर्ण अंधारात करायला हवा. एक गुळगुळीत फरशी घ्या. ओटा किंवा दगडी पोळपाट चालेल. त्याच्यावर थोडी साखर पसरा. हातात बत्ता घ्या. पूर्ण अंधार करा. बत्त्याने दाबत साखर चुरडा. चुरडताना निळसर उजेड पडलेला दिसेल.
साखरेचे स्फटिक बनत असताना त्यात कुठे कुठे आयन अडकून पडलेले असतात. साखर चुरडताना ते हवेशी संपर्कात येतात. त्यांची रासायनिक क्रिया होते त्यावेळी उजेड रुपात ऊर्जा बाहेर पडते.

14. दुरून पेटणारी मेणबत्ती
साहित्य – मेणबत्ती, काड्यापेटी.
कृती – एक मेणबत्ती घ्या. स्टॅंडवर किंवा बशीत किंवा पक्क्या आधारावर ठेवा. काड्यापेटीने मेणबत्ती पेटवा. तिची ज्योत चांगली स्थिर होऊ द्या. मेणबत्ती एकाच फुंकरीत पटकन् विझवा. मेणबत्तीच्या विझलेल्या ज्येतीतून एक धुराची रेषा वर गेलेली दिसेल. ती रेषा अखंड असतानाच एक काडी पेटवून धुराच्या रेषेच्या टोकाला लावा. एक बारीक ज्योत मेणबत्तीच्या वातीपर्यंत जाताना दिसेल. मेणबत्ती पुन्हा प्रज्वलीत होईल. धुराची रेषा अखंड नसेल तर तसे होणार नाही.
मेणाचा धूर किंवा कोणतीही गोष्ट पेटण्यासाठी तिचे तापमान पेट घेण्यालायक असायला लागते शिवाय एक ज्योत किंवा ठिणगी तरी लागते. 

13. कागदी पट्टीचा झुकता पूल
साहित्य – कागद, कात्री, पट्टी, डिंक, पुठ्ठा
कृती – कागदाची १५ सेंटीमाटर लांब आणि २ सेंटीमीटर रुंद आकाराची पट्टी कापून घ्या. दोन्ही टोकांपासून एक सेंटीमीटर अंतरावर पट्टी दुमडून घ्या. दुमडलेल्या भागांना एका बाजूने डिंक लावून ती टोके पुठ्ठ्यावर चिकटवा. त्याच्यातील अंतर ७ ते ८ सेंटीमीटर राहील असे पहा. कागदाच्या या कमानीखालून लांब फुंकर मारा. कमान वर न जाता खाली जाते.
फुंकरीमुळे कमानीखाली हवेचा दाब कमी होतो व ती ढकलली जाते.

  12. पांढरा बगळा होई काळा

साहित्य – ५ सेंटीमीटर लांबीचा कागदी चौरस, पेन्सिल, ब्रश, काळा रंग इ.
कृती -  ५ सेंटीमीटर लांबीचा एक कागदी चौरस घ्या. त्याच्यावर पेन्सिलीने बगळ्याची रेखाकृती काढा. डोळा काळा रंगवा. बगळा सोडून बाकी पूर्ण कागद काळ्या रंगाने रंगवा. बगळ्याच्या डोळ्याकडे एक मिनिट एकटक पहा. मग तुमची नजर एखाद्या सपाट एकरंगी भिंतीवर न्या. तुम्हाला बगळ्याची रेखाकृती काळी दिसेल.
आपल्या डोळ्याच्या पटलावर झालेल्या पांढर्‍या रंगाच्या प्रभावामुळे नंतर तो भाग कमी प्रकाश पाहतो म्हणून तो भाग काळा झाल्यासारखा वाटतो.

11. रंग वाचता येतात की शब्द?
साहित्य – कोरा कागद, पेन्सिल, रंगीत खडू किंवा ब्रश - रंग
कृती – एक कोरा कागद घ्या. त्यावर पेन्सिलिने मोठ्या पुसट अक्षरात तुम्हाला माहिती असलेल्या रंगांची नावे लिहा. ती नावे कोणताही दुसरा रंग वापरून ठळक करा. उदा. लाल हा शब्द काळ्या रंगाने रंगवा. सर्व अक्षरे वेगळ्या रंगांनी रंगवून झाल्यावर. शब्द न वाचता रंग मोठ्याने वाचून दाखवायला इतरांना सांगा.
आपला मेंदू वाचनाची क्रिया रंगाऐवजी शब्दांशी जोडतो असे आढळते. 

लाल पिवळा निळा हिरवा तपकिरी नारिंगी जांभळा


10. मोहरीच्या दाण्यांचा नाच
साहित्य – मोहरी, प्लॅस्टिकची पिशवी, पिना भरलेला स्टेपलर.
कृती – एक प्लॅस्टिकची पिशवी घ्या. मोहरीच्या दाण्यांनी पिशवी अर्धी भरा. पिशवीचे तोंड दोन घड्या घालून बंद करा. त्यावर स्टेपलरने आवश्यक तितक्या पिना मारा. पिशवीचे एक टोक एका हाताच्या चिमटीने उचला. त्याच्या विरूद्ध असलेले पिशवीचे टोक दुसर्‍या हाताच्या चिमटीने पकडा. पिशवी डोळ्यांसमोर धरून हळुहळू गोलाकार फिरवा. पिशवीतले मोहरीचे दाणे नाचताना दिसतील.
पिशवी फिरवताना होणार्‍या छोट्याश्या घर्षणानेही स्थिर विद्यूत तयार होते.

  9. टिव्हीला ट्रांझिस्टर लावला तर...
साहित्य – टिव्ही संच, ट्रांझिस्टर
टिव्ही चालू करा. एलईडी, एलसीडी टिव्ही चालणार नाही लांबट असलेलाच हवा. एक ट्रान्झिस्टर घ्या. मोडका, बंद असलेलाही चालेल. त्यात सेल नसले तरी चालेल. तो हळुहळू चालू टिव्ही संच्याच्या पडद्याजवळ न्या. काही ठिकाणी पडद्यावरचे रंग, आकार बदललेले दिसतील.
टिव्ही संचातील किरण म्हणजे जोरात फेकले गेलेले इलेक्ट्रॉन असतात. त्यांचा मार्ग चुंबकीय क्षेत्रामध्ये बदलतो.

8. भेटीची आस बोटांना
साहित्य – आपले हात
दोन्ही हातांची बोटे एकमेकांत गुंफा. पकड घट्ट ठेवा. दोन्ही हाताच्या अंगठ्या शेजारची बोटे सरळ करून ताणा. त्यांची टोके एकमेकांना जोडा. नंतर त्यांच्यात सुमारे एक सेंटीमीटर अंतर ठेवून निरीक्षण करा. बोटे एकमेकांकडे आपोआप ओढली जातील. ती वेगळी ठेवण्यासाठी मुद्दाम प्रयत्न करावे लागतात.
वक्र झाल्यावर बोटातले स्नायू नैसर्गिकपणे पकड मजबूत करू बघतात.

7.  रंगी स्क्रीचे को
साहित्य – पाणी, रंगीत पडदा असलेले उपकरण – टिव्ही, मोबाईल, टॅब, संगणक इ.
रंगीत पडदा असलेले एक उपकरण घ्या. ते चालू करा. एका हाताच्या चिमटीत पाणी घ्या. रंगीत स्क्रीनजवळ चिमूट नेऊन किंचित सैल करा. तोंडाने पाण्यावर जोरात फुंकर मारा. पाण्याचे काही शिंतोडे स्क्रीनवर पडतील. त्यातून स्क्रीनवरचे कोश पहा. मान थोडी हलवून त्यांचे रंग तपासा.
कोश लाल, हिरवा, निळा या तीन रंगांचेच असतात.

6. कावळा काळा तरी दिसे पांढरा
साहित्य – ५ सेंटीमीटर लांबीचा कागदी चौरस, पेन्सिल, ब्रश, काळा रंग इ.
कृती -  ५ सेंटीमीटर लांबीचा एक कागदी चौरस घ्या. त्याच्यावर पेन्सिलीने कावळ्याची रेखाकृती काढा. डोळा सोडून बाकी पूर्ण कावळा काळ्या रंगाने रंगवा. त्याच्या डोळ्याकडे एक मिनिट एकटक पहा. मग तुमची नजर एखाद्या सपाट एकरंगी भिंतीवर न्या. तुम्हाला कावळ्याची रेखाकृती पांढरी दिसेल.
आपल्या डोळ्याच्या पटलावर झालेल्या काळ्या रंगाच्या प्रभावामुळे नंतर तो भाग अधिक प्रकाश पाहू शकतो म्हणून तो भाग पांढरा झाल्यासारखा वाटतो. 

 5. भात निळा करणे.
साहित्य - शिजवलेला भात, लिंबू, आयेडाइज्ड मीठ, ताटली, डाव, छोटा चमचा, सुरी.
कृती - सुरीने कापून लिंबाच्या फोडी करून एका ताटलीत कडेला ठेवा. ताटलीत एक डावभर शिजवलेला गरम भात घ्या. त्याच्यावर छोटा चमचाभर आयोडाइज्ड मीठ टाका. त्याच्यावर लिंबाच्या रसाचे तीन थेंब टाका. थोडा वेळ गडद निळी रंगछटा दिसेल.
मीठातील आयोडीनची भातातील पिठूळ पदार्थाशी रासायनिक क्रिया होऊन निळ्या रंगाचे अस्थिर संयुग तयार होते.

4. बदलत्या रंगाचे कुंकू
साहित्य – लाल कुंकू पूड. चमचा, रुमाल, ज्योत. कागद.
कृती - एका चमच्याच्या अर्ध्या दांडीला रुमाल गुंडाळा. त्या चमचात अर्धा चमचा भरेल इतकी लाल कुंकवाची पूड घ्या. चमचातील कुंकू ज्योतीवर घरून तापवा. ते काळे पडेल. हे काळे पडलेले कुंकू कागदावर ओता. थोड्या वेळात ते पुन्हा लाल होईल.
उष्णतेमुळे कुंकवातील जल निघून जाते म्हणून ते काळे पडते गार होताना हवेतील बाष्प शोषून ते जलभरण करते त्यामुळे पुन्हा लाल होते.

3. हळदीचे कुंकू, कुंकवाची हळद
साहित्य – हळद पूड, पाणी, खायचा चुना, लिंबाची फोड.
कृती - हळदीची चिमूटभर पूड हातावर ठेवा. त्यावर थोडे पाणी घाला. हातावर हात चोळून हळदीची पिवळा रंग हातभर पसरू द्या. कणीभर खायच्या चुना हळद लावलेल्या हातावर ठेवा. पुन्हा हातावर हात ठेवून चोळा. हात कुंकवासारखे लाल होतील. आता त्यावर दोन थेंब लिंबू रस टाका. पुन्हा हातावर हात ठेवून चोळा. हात पुन्हा पिवळे होतील.
हळदीचा रंग आम्लारी पदार्थामुळे लाल होतो तर आम्लामुळे पिवळा.

2. साखरेचा खाद्य रंग
साहीत्य - साखर, एक डाव, छोटी कढई, चिमटा, चूल, गॅस किंवा स्टोव, लांब दांडाची चमचा, कृती - छोटा चमचा, डबी लागेल. चूल पेटवा तिच्यावर छोटी कढई ठेवा. ती तापू द्या. तिच्यात साखरेचे २-३ दाणे घाला. साखरेचे दाणे थोडे वितळल्यासारखे दिसले की तिच्यात डावभर साखर घाला. कढई चिमट्याने पकडून छोट्या चमच्याने साखर हलवा. साखर वितळत जाईल तसतसा खमंग वासाचा एक तांबूस करपट रंग येतो. त्याला कॅरॅमल म्हणतात. कढई चुलीवरून उतरवून गार झाल्यावर कॅरॅमल नंतर वापरण्यासाठी डबीत भरून ठेवा.
साखरेचे कण अर्धवट जळल्यामुळे, अर्धवट वितळल्यामुळे, त्यांच्या मिश्रणामुळे हा रंग तयार होतो.

1. कर्ब वायू ओतणे
साहित्य – पाणी, खाण्याचा सोडा, लिंबू. साधने – मेणबत्ती, काड्यापेटी, खोलगट तसराळे, बाटली.
कृती – एका बाऊलमध्ये किंवा खोलगट तसराळ्याच्या आत एक छोटी मेणबत्ती पेटवून ठेवा. एका बाटलीत थोडे पाणी घेऊन त्यात थोडा खाण्याचा सोडा विरघळवा. त्याच्याच थोडा लिंबाचा रस घाला. फसफसण्याची क्रिया सुरू होईल. ती थोडी कमी झाल्यावर पेटलेल्या मेणबत्तीच्या पात्रात बाटलीतील वायू ओता. बरोबर ओतलात तर मेणबत्ती विझेल.
कर्बवायू हवेपेक्षा जड असतो म्हणून ओतला जातो.
स्त्रोत : मराठी विज्ञान परिषद, पुणे

No comments

Powered by Blogger.